Share Market Today: गुरुवारी 28 डिसेंबर रोजीही शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही व्यवहारादरम्यान त्यांच्या नवीन सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत बंद झाला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे १.६९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ऑईल अँड गॅस, मेटल, एनर्जी, एफएमसीजी आणि रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, आयटी आणि इंडस्ट्रिअल शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 0.66% आणि 0.23% च्या वाढीसह बंद झाले.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 371.95 अंकांच्या किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 72,410.38 अंकांवर बंद झाला. दरम्यान, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 123.95 अंकांनी किंवा 0.57 टक्क्यांनी वाढून 21,778.70 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹1.69 लाख कोटी
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप 28 डिसेंबर रोजी वाढून 363 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 27 डिसेंबर रोजी 361.31 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.69 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.69 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
हे शेअर्स सर्वाधिक वधारले
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.11 टक्के वाढ झाली आहे. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि त्यात 1.81% ते 2.58% पर्यंत तेजी दिसून आली.
यात सर्वाधिक घसरण
तर सेन्सेक्सचे उर्वरित 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) शेअर 1.13 टक्क्यांनी घसरला. तर बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स 0.35% ते 0.61% च्या घसरणीसह बंद झाले.