Join us

शेअर बाजाराची 'विक्रमी' कामगिरी, पहिल्यांदा ८१,००० पार; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बंपर तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:04 PM

Sensex-Nifty All Time High: बीएसई सेन्सेक्सनं आजच्या व्यवहारादरम्यान पुन्हा इतिहास रचला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ८१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाल्यानंतरही दुपारी कामकाजादरम्यान सेन्सेक्सनं हा उच्चांक गाठला.

Sensex-Nifty All Time High: बीएसई सेन्सेक्सनं आजच्या व्यवहारादरम्यान पुन्हा इतिहास रचला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ८१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाल्यानंतरही दुपारी कामकाजादरम्यान सेन्सेक्सनं हा उच्चांक गाठला. खालच्या स्तरावरून गुंतवणूकदारांच्या खरेदीतून परतल्यानंतर सेन्सेक्स ने ८१० अंकांची झेप घेत ८१ हजार २०३ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही पहिल्यांदाच २४,७०० ची पातळी ओलांडून २४,७४६.८० अंकांची उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीनंही खालच्या स्तरावरून २३४ अंकांची जबरदस्त उरळी घेतली.

खालच्या स्तरावरून जबरदस्त पुनरागमन

सकाळी सेन्सेक्स जवळपास २०० अंकांच्या घसरणीसह उघडला आणि ३२६ अंकांनी घसरला. पण या पातळीवर बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आल्यानं सेन्सेक्स खालच्या पातळीवरून ८१३ अंकांनी उसळी घेत ८१ हजार २०३ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ८१ हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीही मागील बंदच्या तुलनेत ११० अंकांनी घसरला होता पण निफ्टीनं खालच्या पातळीवरून २४३ अंकांची उसळी घेत २४,७४६.८० अंकांचा उच्चांक गाठला. सेन्सेक्स - निफ्टीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला असला तरी आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधून चमक गायब आहे. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

अर्थसंकल्पापूर्वी बाजारात तेजी

भारतीय शेअर बाजारात परतलेल्या या तेजीला अर्थसंकल्पाशी जोडलं जात आहे. भांडवली खर्चासाठी सरकारनं अधिक पैशांची तरतूद केल्यास रेल्वे, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता अर्थसंकल्पात व्यक्त केली जात आहे. तसंच सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्पात भेट देऊ शकते, त्यामुळेच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ही तेजी दिसून आली आहे.

टॅग्स :शेअर बाजार