Share Market Today: अमेरिकेतील मंदीची भीती आणि जागतिक बाजारातील उलथापालथीमुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे एका झटक्यात सुमारे १५.५ लाख कोटी रुपये बुडाले. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही २.५ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये आणखी जोरदार विक्री दिसून आली.
बीएसई मिडकॅप निर्देशांक ३.६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४.२१ टक्क्यांनी घसरून बंद झाला. बीएसईचे सर्व सेक्टोरल निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. मेटल, रियल्टी, कॅपिटल गुड्स आणि युटिलिटी शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स २,२२२.५५ अंकांनी म्हणजेच २.७४ टक्क्यांनी घसरून ७८,७५९.४० वर बंद झाला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ६६७.७५ अंकांच्या घसरणीसह २४,०५५.६० च्या पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे १५.५ लाख कोटी बुडाले
बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप शुक्रवारी ४५७.१६ लाख कोटी रुपयांवरून ५ ऑगस्ट रोजी ४४१.६६ लाख कोटी रुपयांवर आलं. अशाप्रकारे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे १५.५ लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १५.५ लाख कोटी रुपयांची घट झाली.
सेन्सेक्सचे केवळ २ शेअर ग्रीन झोनमध्ये
ही घसरण इतकी तीव्र होती की, सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ २ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल) ०.९७ टक्के आणि नेस्ले इंडियाचा शेअर ०.७५ टक्क्यांनी वधारून बंद झाला.
या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
तर सेन्सेक्सचे उर्वरित २८ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यातही टाटा मोटर्सचे शेअर्स ७.३८ टक्क्यांनी सर्वाधिक घसरले. याशिवाय अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स ४.१९ टक्के ते ५.८३ टक्क्यांदरम्यान बंद झाले.