stock market : शेअर बाजारात गेल्या ५ महिन्यात गमावलं ते अवघ्या ६ दिवसांत कमावलं, अशी अवस्था सध्या गुंतवणूकदारांची झाली आहे. देशांतर्गत बाजारात पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदार परतताना पाहायला मिळत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बाजाराचे आकर्षक मूल्यांकन आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे सकारात्मक संकेत. विशेष म्हणजे ५ महिन्यांनंतर बाजारात आलेल्या रिकव्हरीने जगभरातील बाजारांना मागे टाकले आहे. बाजाराच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये २५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बाजारात आज कशी स्थिती होती?सोमवारी बीएसई सेन्सेक्स १,०७८.८८ अंकांनी उसळी घेत ७७,९८४.३८ वर बंद झाला. त्याच वेळी NSE निफ्टी ३२३.५५ अंकांनी वाढून २३,६७३.९५ अंकांवर पोहोचला. गेल्या ६ दिवसातील वाढ बघितली तर सेन्सेक्स ४१५४ अंकांनी वर गेला आहे. १७ मार्च रोजी सेन्सेक्स ७३,८३०.०३ अंकांवर उघडला होता. आज म्हणजेच २४ मार्च रोजी सेन्सेक्स ७७,९८४.३८ अंकांवर बंद झाला. अशा प्रकारे, गेल्या ६ दिवसांत सेन्सेक्स ४१०० हून अधिक अंकांनी वाढला आहे. बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांनीही बंपर कमाई केली आहे. शेअर गेल्या ६ दिवसांत २५.६९ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.
शेअर बाजारात तेजीचे कारण काय?
- गेल्या ५ महिन्यांपासून विक्री करणाऱ्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारपेठेकडे आकर्षित झालेत. गेल्या ४ सत्रांपैकी ३ सत्रांमध्ये एफआयआयने खरेदी केली आहे. २१ मार्च रोजी, एफआयआयने ७,४७० कोटी रुपयांची खरेदी केली, ज्यामुळे बाजारातील भावना मजबूत झाली.
- जगभरात ट्रम्प टॅरिफचे सावट असताना भारताची मजबूत अर्थव्यवस्था आणि वाजवी मूल्यांकनामुळे एफआयआय पुन्हा खरेदीकडे आकर्षित झाले. यामुळे बाजारात खरेदी वाढली आहे.
- डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील १० वर्षांच्या ट्रेझरी उत्पन्नात सुमारे ४० बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे. यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमधील गुंतवणूक अधिक आकर्षक झाली आहे. गुंतवणूकदार अमेरिकेतून भांडवल काढून ते भारतासारख्या बाजारपेठेत गुंतवत आहेत.
- तांत्रिकदृष्ट्याही बाजारात ताकद दिसून येत आहे. निफ्टीने गेल्या आठवड्यात एक मजबूत व्हाईट-बॉडी मारुबोझू कँडल तयार केली. ज्यामुळे फेब्रुवारीचे सर्व नुकसान जवळजवळ वसूल झाले.