Join us

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, महिंद्रा वधारला, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 9:46 AM

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 165 अंकांनी घसरला आणि 72496 च्या पातळीवर उघडला.

शेअर बाजारातील कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 165 अंकांनी घसरला आणि 72496 च्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 63 अंकांनी घसरला आणि 21960 च्या पातळीवर उघडला. मात्र अवघ्या काही मिनिटांतच त्यात तेजी दिसून आली. परंतु नंतर पुन्हा एकदा त्यात घसरण झाली.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात किंचित वाढ होत होती तर निफ्टी मिडकॅप 100, आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस यासारख्या निर्देशांकात घसरण दिसून आली. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती ते म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, टाटा स्टील, डॉ रेड्डीज, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक आणि ब्रिटानिया हे होते. 

अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. सोमवारी गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती. अदानी टोटल गॅस लिमिटेडचे ​​शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आणि 940 रुपयांवर व्यवहार करत होते, तर एनडीटीव्हीचे शेअर्स किरकोळ घसरणीसह 218 रुपयांवर व्यवहार करत होते. 

सोमवारी, प्री ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 56 अंकांच्या घसरणीसह 72,587 च्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टी 32 अंकांच्या घसरणीनंतर 21990 च्या पातळीवर कार्यरत होता. भारतातील शेअर बाजाराचे कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकते असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. तथापि, आशियाई शेअर बाजारात सोमवारी सुरुवातीच्या कामकाजात वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार