Stock Market Today: अमेरिकन बाजारातील विक्रीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची तर निफ्टीत १५० अंकांची विक्री झाली आहे. बँक निफ्टीमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. यामध्येही ४०० हून अधिक अंकांची घसरण झाली.
मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टीच्या ओपनिंगबद्दल बोलायचं झालं तर सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून ७४,८९३ वर, निफ्टी १८६ अंकांनी घसरून २२,६०९ वर, बँक निफ्टी ३६२ अंकांनी घसरून ४८,६१९ वर तर रुपया १५ पैशांनी मजबूत होऊन ८६.५६ प्रति डॉलरवर उघडला.
या शेअर्समध्ये तेजी/घसरण
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आज निफ्टी आयटी आणि मेटलवर प्रचंड दबाव आहे. आयटीमध्ये सुमारे २ टक्के आणि मेटलमध्ये १.३६ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. मात्र, आज निफ्टी फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. त्याचे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. कामकाजादरम्यान एचडीएफसी, टीसीएस, टेच महिंद्रा, एचसीएलटेक, झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. तर दुसरीकडे सनफार्मा, मारुती, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली असून डाऊ जोन्स ७५० अंकांनी तर नॅसडॅक ४५० अंकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. आर्थिक वृद्धी आणि वाढत्या महागाईच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण होती. यामुळे गिफ्ट निफ्टीही १५० अंकांनी घसरून २२,७०० च्या खाली आला. मात्र, डाऊ फ्युचर्समध्ये १५० अंकांची सुधारणा दिसून आली. जपानमधील बाजारपेठा बंद होत्या.
कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव तीन टक्क्यांनी घसरून दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ७४ डॉलरवर आला आहे. सोनं २,९५० डॉलरवर स्थिर होतं, तर चांदी १.५% घसरून ३३ डॉलर प्रति औंस झाली. देशांतर्गत बाजारातही दबाव दिसून आला, जिथे सोनं ८६,००० रुपयांच्या आसपास आणि चांदी ९०० रुपयांनी घसरून ९६,२०० रुपयांच्या खाली बंद झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, पण त्या बदल्यात त्यांनी युक्रेनला नाटोचे सदस्यत्व द्यावं आणि या भागात शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी केली आहे.