Join us

टाटाच्या या स्टॉकने इन्व्हेस्टर्सना केलं मालामाल, अडीच वर्षात ६०० टक्क्यांनी वाढ, मिळाला ७ पट परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:48 PM

Stock Market: टाटा मोटर्ससाठी मागची दोन-अडीच वर्षे बऱ्यापैकी फायदेशीर ठरली आहेत. यादरम्यान, कंपनीच्या कारच्या विक्रीमध्येच वाढ झाली आहे. त्याबरोबरच कंपनीच्या स्टॉकने शेअर मार्केटमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे.

मुंबई - टाटा मोटर्ससाठी मागची दोन-अडीच वर्षे बऱ्यापैकी फायदेशीर ठरली आहेत. यादरम्यान, कंपनीच्या कारच्या विक्रीमध्येच वाढ झाली आहे. त्याबरोबरच कंपनीच्या स्टॉकने शेअर मार्केटमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या अडीच वर्षांत टाटा मोटर्सच्या स्टॉकने ६०० पटीहून अधिक उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचा पैसा सात पटीने वाढला आहे.

आजपासून सुमारे अडीच वर्षांपूर्वी ३ एप्रिल २०२० रोजी टाटा मोटर्सच्या एका शेअरचा भाव ६५.३० रुपये होता. शुक्रवारच्या व्यवहारामध्ये हा स्टॉक १.२५ टक्के वाढून ४६४.८० रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे गेल्या अडीच वर्षांदरम्यान, टाटा मोटर्सच्या स्टॉकच्या किमतीमध्ये ६११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना ७.१२ टक्के रिटर्न मिळालं आहे. म्हणजेच जर गुंतवणुकदारांनी एप्रिल २०२० मध्ये या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आज ७.२ लाख रुपये झाले आहेत. 

दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे टाटाच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असत. झुनझुनवाला यांना टाटाच्या टायटनच्या स्टॉकने मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून दिला होता. टाटा मोटर्समध्येही राकेश झुनझुनवाला यांची १.०९ टक्के भागीदारी होती.

कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिल्यास जूनच्या तिमाहीच्या अखेरीपर्यंतचे आकडे पाहिल्यास यामध्ये ४०.०८ लाख पब्लिक शेअर होल्डर्सजवळ १७८ कोटी शेअर म्हणजेच ५३.६० टक्के भागीदारी होती. तर आठ प्रवर्तकांकडे ४६.४० भागीदारी आहे. म्युच्युअल फंडांकडे कंपनीचे २२.६७ कोटी शेअर म्हणजे ६.८३ टक्के भागीदारी आहे.  

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक