Stock Market Today: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजारात आज फ्लॅट ओपनिंग दिसून येत आहे. सेन्सेक्स १२४ अंकांनी घसरून ७४,१०३ वर उघडला. निफ्टी ७५ अंकांनी घसरून २२,४६० वर उघडला. बँक निफ्टी २४ अंकांच्या घसरणीसह ५०,४८७ वर उघडला. आज सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी आणि फार्मा सेक्टरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.
कामकाजादरम्यान पॉलरग्रिड, नेस्ले इंडिया, महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर टीसीएस, इन्फोसिस, एचसीएलटेक, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
आज सकाळी १० वाजता येणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयांकडे भारतीय शेअर बाजाराच्या नजरा लागल्या आहेत. रिझर्व्ह २५ बेसिस पॉईंट्सची कपात करू शकते, असं सर्वच तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महागाईवर नियंत्रण आणणे आणि आर्थिक हालचालींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारात अस्थिरता कायम आहे. अमेरिकेने चीनवर १०४ टक्क्यांपर्यंत शुल्क लादलं असून इतर ८६ देशांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. "चीनला व्यापार करार करायचा आहे, पण त्याची सुरुवात कशी करायची हे कळत नाही," असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. या वक्तव्यामुळे आणि टॅरिफ कारवाईमुळे व्यापारयुद्धाची परिस्थिती अधिक चिघळत असल्याचं दिसत आहे.
अमेरिकी बाजारात घसरण सुरूच
या तणावाचा परिणाम अमेरिकेच्या बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. डाओ जोन्स दिवसाच्या उच्चांकी पातळीपासून १८०० अंकांनी घसरून ३२० अंक खाली बंद झाला, तर नॅसडॅक सुमारे १३०० अंकांच्या चढ-उतारानंतर ३५० अंकांनी घसरला. सलग चार दिवसांत डाऊ ४६०० अंकांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे गिफ्ट निफ्टी २७५ अंकांनी घसरून २२,३५० वर तर डाऊ फ्युचर्समध्ये ६५० अंकांची घसरण दिसून आली. आशियाई बाजारातही मोठी घसरण झाली, जिथे निक्केई १००० अंकांनी घसरला.
कालच्या तेजीतही एफआयआयने कॅश सेगमेंटमध्ये ५००० कोटी रुपयांसह एकूण ५७०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३१०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. कच्च्या तेलाच्या किमतीही दबावाखाली असून, गेल्या चार वर्षांत प्रथमच ६१ डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तीन हजार डॉलरच्या खाली असला तरी देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ७०० रुपयांनी वधारून ८७,७०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीही ३०० रुपयांनी वधारून ८८,९०० रुपयांवर बंद झाली.