Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. बाजारात कालच्या रिकव्हरीनंतर आज पॉझिटिव्ह ट्रिगर पाहायला मिळाले आणि सुरुवातही दमदार झाली. सेन्सेक्स सुमारे ४७५ अंकांच्या वाढीसह ७४,२०४ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी सुमारे १५० अंकांच्या वाढीसह २२,४७६ च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी बँकही २५५ अंकांच्या वाढीसह ४८,७४४ च्या पातळीवर होता. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ५०० अंकांनी वधारून ४९,६६६ च्या पातळीवर होता.
मात्र, त्यानंतर बाजार वरच्या पातळीवरून घसरताना दिसला. निफ्टी वरच्या पातळीवरून सुमारे १८० अंकांनी घसरला. सेन्सेक्स ६८० अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी ४०० अंकांच्या वरच्या पातळीच्या जवळ घसरला. मिडकॅप निर्देशांक सुमारे ५५० अंकांनी घसरला. स्मॉलकॅप निर्देशांक १७० अंकांनी घसरला.निफ्टीवर टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक २ टक्क्यांनी वधारले. त्याचबरोबर बीपीसीएल, रिलायन्स, विप्रो, श्रीराम फायनान्स मध्येही तेजी दिसून आली. तर अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कन्झ्युमर, ब्रिटानिया, सन फार्मा, पॉवर ग्रिड या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
टॅरिफमध्ये काहीसा दिलासा
टॅरिफ वॉरवर काही प्रमाणात दिलासा मिळाल्याच्या बातमीनं अमेरिकी बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. त्याचवेळी आशियाई बाजारात आज तेजी दिसून आली. गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी वधारला. खरं तर ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनेडियन कार कंपन्यांवरील शुल्क एक महिन्यासाठी पुढे ढकललं असून इतर गोष्टींवरही सूट देण्याची त्यांची तयारी आहे. टॅरिफ वॉरबाबत ट्रम्प यांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे अमेरिकी बाजारात तेजी दिसून आली. ४०० अंकांच्या सुधारणेमुळे डाऊ जवळपास ५०० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक २७० अंकांनी वधारला. निक्केई ३०० अंकांनी वधारला होता.