Share Market : शेअर बाजार हा कायम गुंतवणूकदारांची परीक्षा पाहात असतो, असं म्हणतात. इथे जो संयम ठेवून गुंतवणूक करतो, त्याला नेहमीच फायदा झाला असल्याचे समोर आलं आहे. गेल्या ५ महिन्यांपासून सातत्याने भारतीय शेअर बाजारात घसरण होत होती. यातून रिलायन्स, टाटा, इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांचेही शेअर्सही सुटले नाहीत. बाजार घसरत असल्याचे पाहून अनेकांनी आपले स्टॉक्ट्स विकून एक्झिट घेतली. मात्र, अशा परिस्थितीत पाय रोवून उभे राहणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या संयमाचे फळ मिळालं आहे.
देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या आठवड्यातील वाढीचा ट्रेंड सोमवारीही कायम राहिला. सलग सहाव्या सत्रात व्यवसायात तेजी दिसून आली. या काळात बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. परदेशी गुंतवणूकदारही भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भारतीय समभागांना आता चांगले दिवस येणार असल्याची आशा बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये वाढत आहे.
सकाळी ११:०१ वाजता, बीएसई सेन्सेक्स ९१९ अंकांनी वाढून ७७,८२३ वर होता, तर निफ्टी ५० निर्देशांक देखील २६४ अंकांनी वाढून २३,६१५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील या तेजीमुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण भांडवल ४.६३ लाख कोटी रुपयांनी वाढून ४१७.९३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचे मन बदललं?शुक्रवारी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) रोख बाजारात ७,५०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक होती. सप्टेंबर २०२४ च्या अखेरीपासून, परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. या कालावधीत, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमधून अंदाजे २९ अब्ज डॉलर्स काढून घेतले.
शेअर बाजारात तेजी का आली?द मिंटच्या वृत्तानुसार, शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या आठवड्यात यूएस फेडच्या बैठकीनंतर, आरबीआयने व्याजदरात कपात करणे, देशी-विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी करणे, भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीबाबत मॉर्गन स्टॅन्लेचा अंदाज या सर्व गोष्टींमुळे शेअर बाजाराने वेग पकडला आहे.