Stock Market Today: शेअर बाजारात विक्रीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. मार्चच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स २६८ अंकांच्या घसरणीसह उघडला आणि ७२,८१७ पर्यंत घसरला. निफ्टीही १४५ अंकांनी घसरून २१,९७४ वर आला. बँक निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर तो १७२ अंकांनी घसरून ४७,९४२ वर आला. सेक्टोरल इंडेक्सचीही तीच स्थिती आहे. आयटी, मेटल, फार्मा आणि रियल्टी क्षेत्रात जोरदार विक्री दिसून येत आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. उर्वरित निर्देशांकही १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
कामकाजादरम्यान, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, झोमॅटो, अॅक्सिस बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे टायटन, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एचसीएलटेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज म्हणजेच ४ मार्चपासून शुल्क लागू करणार असून ट्रम्प हे शुल्क शिथिल करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या तारखेपासून मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के आणि चीनवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लागू होईल. पण ट्रम्प यांनी शुल्काबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अमेरिकी बाजारात खळबळ उडाली.
काल ११०० अंकांच्या प्रचंड उलथापालथीदरम्यान डाऊ ६५० अंकांनी घसरून दीड महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला, तर नॅसडॅक ५०० अंकांनी घसरून ४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. एस अँड पी ५०० मध्ये अडीच महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदविण्यात आली. त्याचा परिणाम सकाळी आशियाई बाजारातही दिसून आला. गिफ्ट निफ्टी १६३ अंकांनी घसरून २२०९६ वर आला. डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी वधारला होता. निक्केई ६०० अंकांनी घसरला होता.