Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी जोरदार ओपनिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स ३२० अंकांनी वधारून ७९,७२८ वर उघडला. निफ्टी ६० अंकांनी वधारून २४,१८५ वर पोहोचला. बँक निफ्टी ११० अंकांनी वधारून ५५,४१४ वर पोहोचला. रुपया ०.०३२ अंकांनी घसरून ८५.१६/डॉलरवर उघडला. निफ्टी मेटल आणि फार्मा निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली. मात्र, बाजार उघडताच निफ्टी आयटी निर्देशांकात मात्र घसरण दिसून आली.
कामकाजादरम्यान इटर्नल, टाटा स्टील, बजाज फायनान्स, कोटक बँक, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, एशियन पेंट्स, इन्फोसिस आणि इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पॉवेल यांना 'मिस्टर टू लेट' आणि 'लूजर' असं संबोधल आणि त्यांनी व्याजदरात त्वरित कपात केली नाही, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने ढकलली जात आहे, असा आरोप केला. या वादामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
अमेरिकी बाजारात घसरण
डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज जवळपास १००० अंकांनी घसरून बंद झाला. यात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. त्याचवेळी नॅसडॅकमध्ये ४०० अंकांची मोठी घसरण नोंदविण्यात आली. या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम जागतिक बाजारावरही झाला. गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी घसरून २४,१०० वर आला, तर डाऊ फ्युचर्समध्ये काहीसा दिलासा मिळून १५० अंकांची तेजी आली. जपानचा निक्केई निर्देशांक १०० अंकांनी घसरला.