Join us

Stock Market Today: १७२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Metal Stocks मध्ये जोरदार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:54 IST

Stock Market Today: कालच्या बंपर तेजीनंतर आज बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १७२ अंकांच्या वाढीसह ७५,४७३ वर उघडला.

Stock Market Today: कालच्या बंपर तेजीनंतर आज बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १७२ अंकांच्या वाढीसह ७५,४७३ वर उघडला. निफ्टी ४० अंकांनी वधारून २२,८७४ वर पोहोचला. बँक निफ्टी ६१ अंकांनी वधारून ४९,३७५ वर पोहोचला. आज सुरुवातीच्या व्यवहारात मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी पाहायला मिळत आहे. निफ्टी मेटल निर्देशांक १.७४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसतोय. तर निफ्टी आयटी १ टक्क्यांच्या प्रचंड घसरणीसह व्यवहार करत आहे. तर निफ्टी फार्मामध्ये किंचित घसरण पाहायला मिळाली.

या शेअर्समध्ये तेजी/घसरण

कामकाजादरम्यान टाटा स्टील, एनटीपीसी, झोमॅटो, एसबीआयएन, इंडसइंड बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसली. तर दुसरीकडे सनफार्मास टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळ सुरू असलेलं युद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत रशियानं युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले ३० दिवसांसाठी थांबवण्यावर सहमती दर्शवली. लवकरच पूर्ण शांतता करारावर चर्चा होईल, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले. या बातमीनंतर जागतिक बाजारात संमिश्र परिणाम दिसून आला.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर बैठकीपूर्वी अमेरिकी बाजारांवर दबाव होता. टेक शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे डाऊ जोन्स २५० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक ३०० अंकांनी घसरला. मात्र, आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक कल दिसून आला. गिफ्ट निफ्टी ७५ अंकांनी वधारून २२,९७५ वर, डाऊ फ्युचर्स ७५ अंकांनी आणि जपानचा निक्केई देखील २०० अंकांनी वधारून व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक