Stock Market Closing On 16 May 2024:शेअर बाजारात आज मोठी उसळी पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स पुन्हा 73000 च्या वर बंद झाला. बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे ही वाढ झाली आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 676 अंकांच्या उसळीसह 73,664 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203 अंकांच्या उसळीसह 22403 अंकांवर बंद झाला.
मार्केट कॅपमध्ये 3 लाख कोटींची वाढ
बाजारातील या प्रचंड वाढीमुळे BSE वर सूचीबद्ध शेअर्सच्या बाजार भांडवलात 3 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 407.35 लाख कोटी रुपयांवर आले, जे गेल्या सत्रात 404.25 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.09 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
कोणत्या सेक्टरमध्ये वाढ...
आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी शेअर्समध्ये झाली. याशिवाय बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस सेक्टर्सचे शेअर्सदेखील तेजीने बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी वाढ पाहायला मिळाली. केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक घसरणीसह बंद झाला.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा 3.5 टक्के, टेक महिंद्रा 2.6 टक्के, भारती एअरटेल 5.5 टक्के, इन्फोसिस 2.6 टक्के, टायटन 2.1 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.7 टक्के, एचडीएफसी बँक 1.4 टक्के वाढीसह बंद झाले. तर, मारुती सुझुकी 2.16 टक्के, टाटा मोटर्स 1.15 टक्के, एसबीआय 1.04 टक्के, पॉवर ग्रिड 0.78 टक्के, इंडसइंड बँक 0.56 टक्के घसरणीसह बंद झाले.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)