Join us

परदेशी गुंतणूकदारांची चीनला पसंती; भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, कोण जास्त आपटलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 3:54 PM

Stock Market Update: सोमवारी शेअर बाजार ग्रीन सिग्नलमध्ये उघडल्यानंतर जोरात आपटला. यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Stock Market Update: गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात वादळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर असलेला बाजार आठवड्यात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या वादळात अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्सही वाहून गेलेत. सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये निर्देशांकांची जोरदार सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर बाजार वरच्या स्तरावरून घसरला. सेन्सेक्स ६०० वरच्या पातळीच्या खाली गेला. निफ्टी २०० अंकांनी खाली आला, तर बँक निफ्टीही ४५० अंकांनी आपटला. मिडकॅप निर्देशांकात १३०० अंकांची मोठी घसरण झाली. स्मॉलकॅप निर्देशांकही ५०० अंकांनी घसरला. परदेशी गुंतवणूकदार भारतातला पैसा काढून चीनमध्ये गुंतवत आहेत.

कोणते शेअर्स वाढले, कुठे घसरले?सुरूवातीला सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला होता. निफ्टी उघडल्यानंतर १०० अंकांपर्यंत वाढ नोंदवत होता. सेन्सेक्स ८२,०६८ च्या आसपास होता. निफ्टी २५,१२५ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी बँकेतही ३०० हून अधिक अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक ५१,७७० च्या वर होता. मिडकॅप ३२० अंकांच्या आसपास आणि स्मॉलकॅपने १३० अंकांच्या आसपास वाढ नोंदवली. सुरुवातीच्या काळात आयटीसी, टाटा मोटर्स, विप्रो, श्रीराम फायनान्स, हीरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, ट्रेंट या शेअर्समध्ये वाढ झाली. त्याच वेळी टायटन, ओएनजीसी, एचयूएल, ब्रिटानिया, अदानी पोर्ट्स या शेअर्समध्ये घसरण झाली.

चीनच्या पथ्यावर कोणते निर्णय गेले?भारतीय शेअर बाजार वेळेपेक्षा वेगाने धावत असल्यामुळे आता त्यात थोडी मंदी येऊ शकते. गेल्या एक वर्षापासून जगभरात भारताला कोणी स्पर्धक नव्हता. मात्र, यापुढे चीनचे मोठं आव्हान असणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. चीन सरकारने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाने प्रमुख व्याजदरात कपात केली आहे. तर बँकांसाठी आवश्यक राखीव प्रमाण (RRR) ०.५० टक्क्यांनी कमी केले आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत सुमारे १४.२ हजार कोटी डॉलर येतील. 

शेअर बाजाराला चालना देण्यासाठी ब्रोकर्ससाठी सुमारे ७१ अब्ज डॉलर किमतीची स्वॅप सुविधा सुरू करण्यात आली आहे. लिस्टेड कंपन्यांच्या शेअर बायबॅकला समर्थन देण्यासाठी पुनर्वित्त करण्याचा पर्याय देण्यात आला होता. याशिवाय, थंडावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आलं आहे. या सर्व गोष्टींमुळे चीनचे मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आणि हाँगकाँगचे मार्केट कॅप अवघ्या १५ ट्रेडिंग दिवसात १.२ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक