stock market updates : कालच्या (बुधवार) तेजीनंतर आज शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात झाली. पण, नंतर अचानक मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. शेअर बाजारात आज झालेल्या भीषण घसरणीमुळे एकच खळबळ उडाली. गुरुवारी बीएसईचा सेन्सेक्स ११९०.३४ अंकांच्या घसरणीसह ७९,०४३.७४ अंकांवर बंद झाला, तर दुसरीकडे एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही ३६०.७५ अंकांच्या घसरणीसह २३,९१४.१५ अंकांवर बंद झाला.
आज सेन्सेक्सने हिरव्या चिन्हात व्यवहार करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे निफ्टीने किंचित घसरणीसह लाल रंगात व्यवहार करण्यास सुरुवात केली. बुधवारी बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली. काल सेन्सेक्स २३०.०२ अंकांच्या वाढीसह ८०,२३४.०८ अंकांवर तर निफ्टी ८०.४० अंकांच्या वाढीसह २४,२७४.९० अंकांवर बंद झाला होता.
एसबीआयच्या शेअर्सने तारलं?
सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले, तर केवळ एका कंपनीचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, यावरुन आजच्या घसरणीचा अंदाज लावता येईल. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी ४६ कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. तर केवळ ४ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स ०.८० टक्क्यांच्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले.
महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये भयानक घसरण
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज सर्वाधिक ३.३६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. इन्फोसिसचे समभाग ३.२८ टक्के, एचसीएल टेक २.४५ टक्के, अदानी पोर्ट्स २.४३ टक्के, बजाज फायनान्स २.४१ टक्के, टेक महिंद्रा २.२८ टक्के, टायटन २.०३ टक्के, टीसीएस १.७८ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.५४ टक्के, पॉवरग्रिड १.३० टक्के, ॲक्सिस बँक १.२९ टक्के, नेस्ले इंडिया १.२३ टक्के, एशियन पेंट्स १.१३ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील १.१२ टक्के, आयसीआय १.१० टक्के, कोटक महिंद्रा बँक १.१२ टक्के घसरणीसह बंद झाले.
या कंपन्यांच्या शेअर्सही तोट्यात बंद
बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसीचे शेअर्स १.०८ टक्क्यांनी घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि आयटीसीचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.