Stock Market Updates : देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (डिसेंबर ४) दिवसभर प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. तरीही बाजार सलग चौथ्या दिवशी हिरव्या रंगात बंद झाले. विशेषकरुन बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. बँकिंग आणि वित्तीय शेअर्सच्या वाढीमुळे येथे चांगली वाढ झाली. निफ्टीमध्ये तळापासून सुमारे १०० अंकांची रिकव्हरी झाली. निफ्टी १० अंकांनी वाढून २४,४६७ वर बंद झाला. सेन्सेक्स ११० अंकांनी वाढून ८०,९५६ वर आणि निफ्टी बँक ६७१ अंकांनी वाढून ५३,२६६ वर बंद झाला.
फायनान्स सेक्टर तेजीतनिफ्टीवरील PSU बँक निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. यासोबतच वित्तीय सेवा निर्देशांकातही १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी बँकांचा निर्देशांकही ०.८४ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ऑइल अँड गॅस, फार्मा, मेटल, एफएमसीजी आणि ऑटो शेअर्स घसरले. एचडीएफसी लाइफ, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल, एनटीपीसी हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. तर, भारती एअरटेल, सिप्ला, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
बाजाराची सपाट सुरुवात
कालच्या बंदच्या तुलनेत बाजाराची सुरुवात किंचित वाढीसह झाली. पण, सुरुवातीच्या व्यवहारात सपाट व्यवहार दिसून आला. सेन्सेक्स १९१ अंकांनी वाढून ८१,०३६ वर उघडला. निफ्टी ३१ अंकांनी वाढून २४,४८८ वर तर बँक निफ्टी ८० अंकांनी वाढून ५२,७७५ वर उघडला. सकाळपासून जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. या आठवड्यात बाजार सातत्याने चांगली कामगिरी दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांकही तेजीत आहेत. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडूनही खरेदी सुरू झाली आहे, त्यामुळे बाजारातील सेंटीमेंट सुधारत आहे. FII ने काल रोख आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये ५७०० कोटी रुपयांहून अधिक खरेदी केली, तर देशांतर्गत फंडांनी २५० कोटी रुपयांची अल्प विक्री केली.
काल अमेरिकन बाजारांमध्ये एका बाजूला तेजी तर दुसऱ्या बाजूला कमजोरी होती. काल नॅस्डॅक आणि S&P देखील विक्रमी पातळीवर बंद झाले. Nasdaq 75 अंकांनी वधारला होता, तर Dow सलग दुसऱ्या दिवशी कमजोर राहिला. ३५० अंकांच्या चढउतारांदरम्यान तो ७५ अंकांनी घसरला.