Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार तेजीने उघडला, पण सुरुवातीच्या व्यवहारातच विक्रीचा दबाव दिसून आला आणि बाजारात घसरण दिसून आली. आज सकाळी सेन्सेक्स १०३ अंकांनी वधारून ८०,०४४ वर, तर निफ्टी ९ अंकांनी वधारून २४,३५० वर पोहोचला. बँक निफ्टी रेड झोनमध्ये १५८ अंकांच्या घसरणीसह ५१६४९ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारातच निफ्टीमध्ये ४० अंकांची घसरण पाहायला मिळत असून तो पुन्हा २४३०० च्या खाली घसरला. तर सेन्सेक्समध्येही १६१ अंकांची घसरण होऊन को ७९,७८० वर आला.
देशभरात आज दिवाळीचा उत्साह असला तरी उद्या शुक्रवारी संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. आज बाजार सुरळीत सुरू आहे. चांगल्या तिमाही निकालानंतर सिप्लाचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वधारला असून तो निफ्टीचा टॉप गेनर आहे. याशिवाय एल अँड टी, हीरो मोटोकॉर्प आणि डॉ. रेड्डीज सारख्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. दुसरीकडे इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि मारुतीचे शेअर्स निफ्टीत सर्वाधिक घसरले.
जागतिक बाजारपेठेवर दबाव
२ ट्रेडिंग सत्रांतील तेजीवर बुधवारी ब्रेक लागला. निफ्टी १२६ अंकांच्या घसरणीसह २४,३४० च्या पातळीवर बंद झाला. जागतिक बाजारावर दबाव दिसून आला. अमेरिकी बाजारात मंदीचे सावट आहे. डाऊ जोन्समध्ये ९१ अंकांची घसरण नोंदविण्यात आली. तो उच्चांकी स्तरावरून ३०० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. आर्थिक आकडेवारी आणि निकालांच्या आधारे अमेरिकेत ही स्थिती दिसून आली.