Join us

Share Market Today : सोमवारच्या घसरणीनंतर आज Sensex-Niftyमध्ये जोरदार रिकव्हरी; गुंतवणूकदारांनी कमावले ₹७.२७ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 9:44 AM

Share Market Sensex-Nifty Recovers: बहुतांश आशियाई बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ७९७०० आणि निफ्टीने २४३०० चा टप्पा ओलांडला. 

Sensex-Nifty Recovers: दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये जगभरातील शेअर बाजारांत जोरदार विक्री दिसून आली आणि देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीही जवळपास ४ टक्क्यांनी घसरले. मात्र, या जोरदार विक्रीनंतर आज मात्र शेअर बाजारात रिकव्हरी दिसून येत आहे. बहुतांश आशियाई बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ७९७०० आणि निफ्टीने २४३०० चा टप्पा ओलांडला. 

निफ्टीचे सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एकंदरीत आज बीएसईवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ७.२७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.२७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स ९४९.९९ अंकांनी म्हणजेच १.२१ टक्क्यांनी वधारून ७९,७०९.३९ वर आणि निफ्टी ५० २७६.४० अंकांनी म्हणजे १.१५ टक्क्यांनी वधारून २४,३३२.०० वर आला. सोमवारी सेन्सेक्स ७८,७५९.४० वर आणि निफ्टी २४,०५५.६० वर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली

एका दिवसापूर्वी म्हणजेच ५ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,४१,८४,१५०.०३ कोटी रुपये होतं. आज ६ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,४९,११,९२३.२५ कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ७,२७,७७३.२२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून ते सर्व ग्रीन झोनमध्ये आहेत. टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 

टॅग्स :शेअर बाजार