Join us  

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; Adani Power खरेदी करू शकते मोठा पॉवर प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 10:50 AM

Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. पाहा काय आहे यामागे मोठं कारण. अदानींशी आहे संबंध.

Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी वधारून ३६.१७ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सना सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर लागलंय. रिलायन्स पॉवरच्या शेअरनं बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २१ टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ एका मोठ्या बातमीनंतर आली आहे.

अदानी पॉवरकडून चर्चा

नागपुरात ६०० मेगावॅटचा बुटीबोरी औष्णिक वीज प्रकल्प खरेदी करण्यासाठी अदानी पॉवरनं बोलणी सुरू केली आहेत. हा वीज प्रकल्प एकेकाळी अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या मालकीचा होता. लाइव्ह मिंटच्या रिपोर्टमध्ये या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी ही माहिती दिली आहे. हा करार २४०० ते ३००० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका व्यक्तीनं नाव न छापण्याच्या अटीवर दिली. हा करार प्रति मेगावॅट ४ ते ५ कोटी रुपये इतका होण्याची शक्यता आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड अंतर्गत हा प्रकल्प संपादित करण्यासाठी अदानी पॉवर सीएफएम अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीशी बोलणी करत आहे.

बुटीबोरी प्रकल्प रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या मालकीचा आहे. सीएफएम अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं सर्व कर्ज १२६५ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. सध्या या प्रकल्पासाठी ही एकमेव कर्जदार कंपनी आहे.

१००% नी शेअर वधारला

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या साडेचार वर्षांत ३१०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी १.१३ रुपयांवर होता. २१ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३६.१७ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये १२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर १६.३७ रुपयांवरून ३६ रुपयांवर गेला आहे. 

गेल्या पाच महिन्यांत रिलायन्स पॉवरचे समभाग ७८ टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ३६.१७ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५.५३ रुपये आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअनिल अंबानीरिलायन्सशेअर बाजार