Join us

पुढचा निघाला! विद्यार्थ्याने शेअर बाजारात एकाच महिन्यात 664 कोटी कमावले; कंपनी मालकाने आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 5:59 PM

Share Market Miracles: धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच आठवड्यातच कंपनीचा मालक आणि सीईओ गुस्तावो अर्नल याने आत्महत्या केलीय. त्यापूर्वीच त्याने शेअर्स विकल्याने सुटला...

शेअर मार्केट कोणाला चंद्रावर तर कोणाला सूर्यावर नेऊन ठेवणारे आहे. काही मोजकी नावे घेता येतील असे लोकच शेअर बाजारात चंद्रावर पोहोचले आहेत. भारताचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच निधन झाले. आता याच बेभरवशी शेअर बाजारात एका विद्यार्थ्याने सुस्साट कमाई केली आहे. त्याचा एक निर्णय त्याला चंद्रावर घेऊन गेला आहे.

एका विद्यार्थ्याने शेअर बाजारात २१५ कोटी रुपये गुंतविले होते. १ महिन्यानंतर त्याने खरेदी केलेले सर्व शेअर्स विकले आणि त्याचे नशीब एवढे फळफळले की त्याला ८७९ कोटी रुपये मिळाले. म्हणजेच एका महिन्यात या तरुणाने ६६४ कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईमुळे त्याच्या पालकांना आता त्याचे अपहरण वगैरे होईल की काय याची चिंता सतावू लागली आहे. अमेरिकेच्या विद्यार्थ्याने ही कमाई केली आहे. जॅक फ्रीमॅन असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो २० वर्षांचा  असून यूनिव्हर्सिटी ऑफ साउथ कैलिफोर्नियामध्ये तो शिकतो. तो मॅथेमॅटिक्स अँड इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत आहे. त्याने शेअर बाजाराचा अभ्यास करून Bed Bath and Beyond या कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. 

जॅकने जुलै महिन्यात ४४० रुपये प्रति शेअरच्या हिशेबाने ५० लाख शेअर खरेदी केले होते. यासाठी त्याला नातेवाईकांनी आणि मित्रांनी पैसे दिले होते. एका महिन्यात या शेअरची किंमत 2160 रुपयांपर्यंत गेली आणि जॅकला जॅकपॉट लागला. त्याने ते सर्व शेअर्स विकून टाकले. 

कंपनीच्या मालकाने केली आत्महत्या...धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच आठवड्यातच कंपनीचा मालक आणि सीईओ गुस्तावो अर्नल याने आत्महत्या केली होती. इनसायडर ट्रेडिंगचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कंपनीने काही लोकांच्या फायद्यासाठी धोकेबाजी केली आणि सामान्य लोकांचे ९६ अब्ज रुपयांचे नुकसान केले असा आरोप ठेवत त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामुळे अचानक या शेअरची किंमत 560 रुपयांवर आली आहे. त्यापूर्वीच जॅकने ते शेअर्स विकल्याने फायद्यात आला आहे. त्या मालकाच्या आत्महत्येशी किंवा त्याच्या धोकेबाजीशी आपला काहीही संबंध नाही असा दावा जॅकने केला आहे. शेअरचा दर इतका पटकन वाढला की मलाही धक्का बसला. सुरुवातीला मी हा स्टॉक 6 महिन्यांसाठी विकत घेतला होता पण नंतर नफा दिसला आणि मी तो मुदतीपूर्वी विकला, असे त्याचे म्हणने आहे. 

टॅग्स :शेअर बाजारअमेरिका