Success Story: यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यासाठी मेहनत, चिकाटी आणि जिद्द असणं महत्त्वाचं आहे. जमुई येथील एका तरुणाने ही गोष्ट सत्यात उतरवली आहे. त्यानं मेहनतीच्या जोरावर ९७३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केलाय. रवी रंजन कुमार असं त्यांचं नाव आहे. स्वप्नांचं वास्तवात रूपांतर करता येते, हे शिकवणारी त्यांची कहाणी नक्कीच प्रेरणा देणारी आहे. पाहूया कसा आहे त्यांचा आजवरचा प्रवास.
बिहारमधील जमुई जिल्ह्यातील रहिवासी रवी रंजन कुमार यांचे वडील शेतकरी आहेत. तर त्यांची आई गावात अंगणवाडी केंद्र चालवत होती. रवी रंजन यांनीही याच अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेतलं. त्यानंतर रवी उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले. तिथलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मार्केटिंगचे शिक्षण घेण्यासाठी ते स्कॉलरशिपवर न्यूयॉर्कला गेले. न्यूयॉर्कमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवी यांना नोकरी न मिळाल्यानं अनेक प्रकारची छोटी-मोठी कामं करावी लागली.
ट्रेडिंगला केली सुरुवात
रवी रंजन कुमार यांनी अमेरिकेच्या ऑपरेशन एन्ड्यूरिंग फ्रीडममध्येही भाग घेतला होता, ज्याअंतर्गत त्यांना अफगाणिस्तानात पाठवण्यात आलं होतं. २००९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. यानंतर रवी यांनी २०१३ मध्ये जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात केली तेव्हा त्याच्या आयुष्याला अनपेक्षित पण सुखद वळण मिळालं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
'गिनिज बुक'मध्ये नाव
रवी रंजन कुमार यांनी अवघ्या १० वर्षांत ९७३ कोटी रुपयांचं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं. गेल्या वर्षी सर्वात अचूक ट्रेडर्सपैकी एक म्हणून रवी कुमार यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. रवी यांनी ५६ हून अधिक देशांचा दौरा केलाय. या काळात त्यांनी हजारो तरुणांना प्रेरित केलं आहे.