Suzlon Energy Share Price: सुझलॉन एनर्जीचा शेअर शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी व्यवहारादरम्यान १.५ टक्क्यांहून अधिक घसरला. परदेशी ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं शेअरचे रेटिंग कमी केल्याच्या वृत्तानंतर ही घसरण झाली. ब्रोकरेज कंपनीनं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात सुझलॉनच्या शेअर्सचं रेटिंग 'ओव्हरवेट'वरून 'इक्वलवेट' केलं आहे. मात्र, शेअरच्या टार्गेट प्राइसमध्ये वाढ करून ती पूर्वीच्या ७३ रुपयांवरून ८८ रुपये करण्यात आली आहे. गुरुवारच्या बंद किमतीच्या तुलनेत हा दर सुमारे ८ टक्क्यांनी अधिक आहे.
सुझलॉनच्या शेअरने गेल्या ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कालावधीत सुमारे १११ टक्के परतावा दिला आहे. निफ्टी निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा हा परतावा खूपच जास्त आहे. या उत्कृष्ट कामगिरीमागील मुख्य कारण म्हणजे सतत नवीन ऑर्डर आणि चांगली बॅलन्सशीट असल्याचं मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलंय.
सुझलॉनच्या ऑर्डर बुकची साईज सुमारे ५ गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे, जी याची ऑल टाईम हाय आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की सुझलॉनला भारतात विंड एनर्जीवर वाढलेल्या फोकसचा फायदा होत राहील आणि येत्या काळात बाजारपेठेतील हिस्सा ३५-४० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
अधिग्रहणाचीही घोषणा
याशिवाय सुझलॉननं काही काळापूर्वी रेनोमच्या अधिग्रहणाची घोषणा केली होती. यामुळे कंपनीला मल्टी ब्रँड ओ अँड एम व्यवसायात प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे. या व्यवसायातून ग्राहक आल्याने सुझलॉनच्या उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास मॉर्गन स्टॅनलीनं व्यक्त केलाय.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)