Suzlon Share Price: रिन्यएबल एनर्जी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी Suzlon एनर्जीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेल्या या शेअरमध्ये आज प्रचंड वाढ झाली. कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे, ज्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 4% वाढ झाली. कालच्या व्यवहाराअंती शेअर 65.40 रुपयांवर बंद झाला होता, तर आज तो 4.6% वाढून 68.43 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला.
सुझलॉनला मिळाली नवीन ऑर्डर
सुझलॉन समूहाला जिंदाल रिन्युएबल्सकडून 302 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. सुझलॉनला ऑक्टोबरमध्येही जिंदाल रिन्युएबल पॉवरकडून 400 मेगावॅट पवन ऊर्जेचे कंत्राटही मिळाले होते.
सुझलॉन आणि जिंदाल रिन्युएबल्सची उपकंपनी JSP ग्रीन विंड 1 ने कर्नाटकातील कोप्पल प्रदेशात अतिरिक्त 302.4 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भागीदारी केली आहे, अशी माहिती सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांनी एका निवेदनात दिली. 2030 पर्यंत जीवाश्म इंधनाचा वापर 50 टक्क्यापर्यंत कमी करण्याच्या भारत सरकारच्या योजनेचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीच्या शेअरची कामगिरी
सुझलॉन शेअर्समध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत, पण हा गुंतवणूकदारांच्या सर्वात आवडत्या शेअर्सपैकी एक आहे. गेल्या 5 दिवसांत स्टॉक 4 टक्क्यांनी वाढला आहे. तर, सहा महिन्यांत त्यात 43% वाढ झाली आहे. तसेच, स्टॉकने या वर्षी आतापर्यंत 76% आणि गेल्या एका वर्षात 70% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, 5 वर्षांपूर्वी, 4 डिसेंबर 2019 रोजी सुझलॉनच्या एका शेअरची किंमत 2 रुपये होती, तेव्हापासून हा शेअर 3200% पेक्षा जास्त वाढला आहे. या वर्षी शेअरने 86.04 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)