Join us

Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 9:29 AM

Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र आता त्यात घसरण होत आहे.

Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र, सध्याच्या एका वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून दोन महिन्यांतच शेअर सुमारे २३ टक्क्यांनी घसरला आहे. आता प्रश्न पडतो की सध्या असलेलं प्रॉफिट बूक करून बाहेर पडावे की अजूनही वाट पाहावी? सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर २.६४ टक्क्यांनी घसरून ६६.३४ रुपयांवर (Suzlon Energy Share Price) बंद झाला.

Suzlon Energy ब्रोकरेजचं म्हणणं काय?

ब्रोकरेज कंपन्यांनी सुझलॉन एनर्जीवर संमिश्र कल ठेवला आहे. एकीकडे व्हेंचुराने ५० रुपयांच्या टार्गेट प्राइसवर विकण्याचा सल्ला दिला आहे, जो सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे २५ टक्के कमी आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शिअलनं शेअरवर बाय रेटिंग ठेवलं असून त्याची टार्गेच प्राईज ८१ रुपये निश्चित करण्यात आलीये. ही किंमत सध्याच्या पातळीपेक्षा २२ टक्क्यांनी अधिक आहे.

वर्षभरात शेअर्सची स्थिती काय?

सुझलॉनच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३३.०५ रुपयांवर होता, जो त्याच्या शेअर्ससाठी एक वर्षातील नीचांकी आहे. या नीचांकी पातळीवरून १२ सप्टेंबर २०२४ रोजी तो १० महिन्यांत १६० टक्क्यांहून अधिक वाढून ८६.०४ रुपयांवर पोहोचला, जो त्याच्या शेअर्सचा वर्षभरातील विक्रमी उच्चांक आहे. सध्या कंपनीचा शेअर या उच्चांकापेक्षा सुमारे २३ टक्क्यांनी घसरलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा