Join us

Swiggy च्या गुंतवणूकदारांना ५० हजार कोटींचा फटका; IPO च्या प्राईजच्या खाली आला स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:08 IST

Swiggy Share Price: देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांचं नुकसान केलंय. शेअरची किंमत आपल्या आयपीओ प्राईजच्याही खाली आली आहे.

Swiggy Share Price: देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या मूल्यांकनात मोठी घसरण झाली असून ती आपल्या उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचं ५० हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालंय.

नोव्हेंबर २०२४ मध्ये आयपीओनंतर डिसेंबर २०२४ पर्यंत स्विगीचं मूल्यांकन १,३२,८०० कोटी रुपये (१६ अब्ज डॉलर) झाले होते. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत तो ८१,५२७ कोटी रुपयांवर (९.८२ अब्ज डॉलर) घसरलं असून मूल्यांकनात ५१,२७३ कोटी रुपयांची घसरण दिसून आली आहे. शेअर बाजारात लिस्टिंग वेळी कंपनीचं मूल्यांकन १२.७ अब्ज डॉलर होतं.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (एनएसई) स्विगीचा शेअर ४२० रुपये आणि मुंबई शेअर बाजारात (बीएसई) ४१२ रुपयांवर लिस्ट झाला. मात्र, घसरणीमुळे हा शेअर आता ३६० रुपयांवर आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून स्विगीच्या शेअरमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

कमकुवत तिमाही निकाल

आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालांमुळे स्विगीच्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला ७९९.०८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो मागील तिमाहीत ६२५.५३ कोटी रुपये होता. आयपीओनंतर शेअरवरील लॉक-इन कालावधी संपुष्टात येणं हाही शेअरच्या घसरणीचं कारण आहे.

२९ जानेवारीला २.९ लाख मिलियन शेअर्सटा लॉक इग पीरिअड संपला होता. ३१ जानेवारी रोजी आणखी तीन लाख शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होते. तर, सर्वाधिक ६५ मिलियन शेअर्स १० फेब्रुवारीला अनलॉक झाले. १९ फेब्रुवारी रोजी आणखी एक लाख शेअर्स अनलॉक झाले. १४ फेब्रुवारी रोजी स्विगीचा शेअर ३२३ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

नोव्हेंबरमध्ये आलेला आयपीओ

नोव्हेंबर २०२४ मध्ये स्विगीनं आपला आयपीओ आणला. कंपनीनं बाजारातून ३९० रुपयांच्या इश्यू प्राइसवर पैसे उभे केले. पण शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम स्विगीच्या शेअरवर झाला असून, फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्समधील स्पर्धा वाढली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्विगीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक