Join us

Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 1:07 PM

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला. पाहूया कधीपर्यंत यात गुंतवणूक करता येईल आणि ग्रे मार्केटमध्ये काय आहे शेअरची स्थिती.

Swiggy IPO: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला झाला. दरम्यान, आयपीओ खुला होण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून स्विगीनं ५,०८५.०२ कोटी रुपये गोळा केले आहेत. त्याला संस्थात्मक गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ह्युंदाई मोटरच्या २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर कंपनीचा ११,३२७.४३ कोटी रुपयांचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. 

आता ग्रे मार्केटमध्ये बोलायचं झालं तर आयपीओच्या अपर प्राइस बँडपेक्षा १२ रुपये म्हणजेच ३.०८ टक्के जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) चालत आहे. मात्र, ग्रे मार्केटमधून संकेत देण्याऐवजी आयपीओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय कंपनीच्या फंडामेंटल आणि फायनान्शिअल्सच्या आधारे घ्यावा, असं मार्केट एक्सपर्टचं म्हणणं आहे.

उभे केले ₹५,०८५.०२ कोटी

स्विगीचे अँकरबुक ५ नोव्हेंबर रोजी ओपन झालं आणि या अंतर्गत कंपनीनं १५१ अँकर गुंतवणूकदारांकडून ५०,८५,०२,३२,२९० कोटी रुपये उभे केले आहेत. या गुंतवणूकदारांना ३९० रुपयांच्या दरानं १३,०३,८५,२११ शेअर्स जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी ४०.६५ टक्के शेअर्स १९ देशांतर्गत म्युच्युअल फंडांच्या ६९ स्कीम्सना देण्यात आलेत.

कोणी गुंतवलेत पैसे?

अँकरबुक अंतर्गत न्यू वर्ल्ड फंड, फिडेलिटी, ओमानी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्स, नोमुरा, पीजीजीएम वर्ल्ड इक्विटी, ब्लॅकरॉक, सिटीग्रुप, सीएलएसए आणि सोसिएट जनरल तसंच आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा एएमसी, एसबीआय म्युच्युअल फंड, अॅक्सिस म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ ट्रस्टी, ३६० वन, मिरे अॅसेट, निप्पॉन लाइफ इंडिया, बंधन म्युच्युअल फंड, इनवेस्को इंडिया, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, सुंदरम एमएफ, टाटा एमएफ, यूटीआय म्युच्युअल फंड, डीएसपी इंडिया फंड, अशोक व्हाईटओक, बडोदा पीएनबी परिबा, हेलिओस एमएफ आणि एव्हेंडस यांनी पैसे गुंतवले. एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, कोटक महिंद्रा लाइफ, आदित्य बिर्ला सन लाइफ, भारती एक्सा लाइफ, एडलवाइज लाइफ, टाटा एआयए लाइफ, रिलायन्स निप्पॉन लाइफ, मॅक्स लाइफ आणि कॅनरा एचएसबीसी लाइफ अशा अनेक विमा कंपन्यांनीही अँकर बुकच्या माध्यमातून पैसे गुंतवले आहेत.

किती आहे प्राईज बँड?

या आयपीओसाठी ३७१ ते ३९० रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय. आयपीओमध्ये तुम्ही ३७१ ते ३९० रुपयांच्या प्राइस बँडमध्ये गुंतवणूक करू शकाल. ७५ टक्के इश्यू क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB), १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप ११ नोव्हेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर १३ नोव्हेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्सची एन्ट्री होईल. इश्यूचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम आहे. या आयपीओअंतर्गत ४,४९९.०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. 

याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे १७,५०,८७,८६३ शेअर्स विकले जातील. यापूर्वी फ्रेश इश्यू साइज ३७५० कोटी रुपये होता आणि ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १८.५ कोटी शेअर्सची विक्री केली जाणार होती, परंतु नंतर नवीन इश्यूची साईज वाढविण्यात आली आणि ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत शेअर्सची विक्री कमी करण्यात आली.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी?

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा तोटा ४,१७९.३ कोटी रुपयांवरून २,३५०.२ कोटी रुपयांवर आला. या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ३६ टक्क्यांनी वाढून ११,२४७.४ कोटी रुपये झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील जून तिमाहीत कंपनीचा तोटा वार्षिक आधारावर ५६४ कोटी रुपयांवरून ६११ कोटी रुपयांवर पोहोचला, परंतु महसूल ३५ टक्क्यांनी वाढून ३,२२२.२ कोटी रुपये झाला.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगस्विगी