Join us  

Swiggy IPO: स्विगी आणणार या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ! ₹१.२५ लाख कोटी असू शकते कंपनीची व्हॅल्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 8:34 AM

Swiggy IPO: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी आपल्या आयपीओच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाहा काय आहे कंपनीचा प्लान.

Swiggy IPO: फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) आपल्या आयपीओच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेली ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून १ ते १.२ अब्ज डॉलर्स उभारण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीला सुमारे १५ अब्ज डॉलर (सुमारे १.२५ लाख कोटी रुपये) एवढ्या मोठ्या मूल्यांकनावर आपला आयपीओ आणायचा आहे. हा या वर्षीचा सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये स्विगीची मुख्य स्पर्धा स्टॉक मार्केटमध्ये आधीच लिस्टेड असलेल्या झोमॅटोशी आहे. या दोन्ही कंपन्यांनी नुकतीच क्विक कॉमर्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे, जिथे किराणा आणि इतर उत्पादनांची १० मिनिटांत डिलिव्हरी केली जातात.

स्विगीला एप्रिलमध्ये आयपीओच्या माध्यमातून १.२५ अब्ज डॉलरपर्यंत निधी उभारण्यास भागधारकांकडून मंजुरी मिळाली होती. कंपनीच्या आयपीओ अर्जाला बाजार नियामक सेबीकडून एक-दोन महिन्यात मंजुरी मिळू शकते. मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी सेबीकडे अंतिम दस्तऐवज सादर करेल, ज्यामुळे आयपीओ लाँच होण्याची तारीख निश्चित होण्याचा मार्ग मोकळा होईल.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, १५ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनावर आयपीओ आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मात्र, शेवटच्या क्षणी हा आकडा बदलू शकतो. आयपीओच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कंपनी इन्स्टामार्ट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि अधिक स्टोरेज उघडण्यासाठी वापरेल, जेणेकरून कंपनीला झोमॅटोशी स्पर्धा करणं शक्य होईल.

२०२२ मध्ये अखेरचं फंडिंग

स्विगीनं २०२२ मध्ये शेवटची फंडिंग फेरी आयोजित केली होती. त्यावेळी कंपनीचं मूल्यांकन १०.७ अब्ज डॉलर्स होतं. दरम्यान, २०२१ मध्ये लिस्टिंग नंतर झोमॅटोच्या शेअर्सची किंमत दुपटीने वाढली आहे. कंपनीचे मार्केट कॅप सध्या २८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.

टॅग्स :स्विगीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगझोमॅटो