-प्रसाद गो. जोशीअमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असलेले टॅरिफ युद्ध हे जगाचे टेन्शन वाढविणारे असून, त्याच्या जोडीलाच या सप्ताहात जाहीर होणाऱ्या कंपन्यांचे निकाल आणि महागाईविषयक आकडेवारी बाजाराला दिशा देण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिका, चीन आणि ब्रिटन यांची जाहीर होणारी आर्थिक आकडेवारीही बाजारावर परिणाम करणारी ठरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेने जगभरातील विविध देशांवर टॅरिफ लावले असताना अचानक ते ९० दिवसांसाठी स्थगित केले आहे. यासाठीचा एकमात्र अपवाद आहे, तो चीनचा!
अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर १४५ टक्के शुल्क लादल्यानंतर चीननेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेच्या उत्पादनांवर १२५ टक्के शुल्क लागू केले आहे. या दोन महासत्तांमधील या टॅरिफ युद्धामुळे या दोनही देशांमध्ये व्यापारयुद्ध भडकणार आहे. त्याचा फायदा कसा करून घेता येईल, ते अन्य देश शोधत आहेत.
मात्र, यामुळे शेअर बाजारावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. गत सप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २०७.४३ अंशांनी, तर निफ्टी ७५.९ अंशांनी खाली आले.
३१,५७५ कोटी काढून घेतले
परकीय वित्तसंस्थांनी आधीच्या आठवड्यामध्ये दाखविलेला खरेदीचा उत्साह हा क्षणभंगूर ठरला आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारातून ३१,५७५ कोटी रुपये काढून घेतले आहेत.
याआधीच्या महिन्यामध्ये (मार्च) या संस्थांनी भारतामधून ३९७३ कोटी रुपये काढून घेतले होते. याआधीच्या महिन्यांपेक्षा ही रक्कम बरीच कमी आहे.
याआधी २१ ते २८ मार्चदरम्यान या संस्थांनी भारतीय बाजारामध्ये ३०,९२७ कोटी रुपये भरले होते. त्यामुळे परकीय वित्तसंस्था पुन्हा खरेदी करण्याची वाटत असलेली अपेक्षा धुळीला मिळाली.