Tata Elxsi Share Price : शुक्रवारी बाजार उघडताच टाटा समूहाची कंपनी टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये जोरदार घसरण झाली. बीएसईवर टाटा एलेक्सीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरून ५९२४ रुपयांवर आला आहे. कंपनीचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. कमकुवत तिमाही निकालानंतर टाटा एलेक्सीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली. कंपनीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार आलेले नाहीत. बाजार विश्लेषकांनी कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईजही कमी केलीये.
जागतिक ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीनं टाटा एलेक्सीवर अंडरपरफॉर्म रेटिंग कायम ठेवलंय. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्सचं टार्गेट प्राइस ६००० रुपयांपर्यंत कमी केलं आहे. मॉर्गन स्टॅनलीनं यापूर्वी टाटा एलेक्सीच्या शेअर्ससाठी ६५०० रुपयांचं प्राइस टार्गेट दिलं होतं. ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनचे टाटा एलेक्सीवर अंडरवेट रेटिंग दिलंय. जेपी मॉर्गननं कंपनीच्या शेअर्ससाठी ५४०० रुपयांचं टार्गेट ठेवलंय. यापूर्वी ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्ससाठी ५७०० रुपयांचं प्राइस टार्गेट दिलं होतं.
नफा १३ टक्क्यांनी घसरला
डिसेंबर २०२४ तिमाहीत टाटा एलक्सीचा निव्वळ नफा १९९ कोटी रुपये होता. तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १३ टक्क्यांची घट झाली आहे. टाटा एलक्सीचं उत्पन्न १.७ टक्क्यांनी घटून ९३९ कोटी रुपयांवर आलंय. कंपनीच्या मीडिया आणि कम्युनिकेशन युनिटच्या महसुलात ५.५ टक्क्यांची घट झाली आहे.
वर्षभरात ३० टक्क्यांहून अधिक घसरण
टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एलक्सीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. १० जानेवारी २०२४ रोजी टाटा एलक्सीचा शेअर ८७५९.५० रुपयांवर होता. १० जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ५९२४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या महिन्याभरात टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९०८२.९० रुपये आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)