दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या आवडत्या स्टॉक टायटननं दीर्घकालीन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी यापूर्वी टायटनचे अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. टायटननं आपल्या कामगिरीनं रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती वाढवली आहे. टायटनचं शेअर्स गुरुवारी कामाकाज्या सुरूवातीला वाढीसह खुले झाले आणि 10 मिनिटांत 2699 रुपयांचा उच्चांक गाठला. टायटनच्या शेअर्समधील या तेजीचा रेखा झुनझुनवाला यांना खूप फायदा झाला आहे.
शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत टायटनचे शेअर्स 49.70 रुपयांनी वधारले आहेत. शेअर्समधील या तेजीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत 233 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टायटनच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2790 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1827.15 रुपये आहे. ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले.
233 कोटींचा फायदामार्च 2023 तिमाहीत टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स किंवा 5.29 टक्के शेअर्स आहेत. गुरुवारी टायटनचा शेअर 10 मिनिटांत 49.70 रुपयांनी वाढला. म्हणजेच 10 मिनिटांत रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 233 कोटी रुपयांनी वाढली. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2022 च्या तिमाहीत टायटनचे 45895970 समभाग होते. म्हणजेच रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचे 10.50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)