Join us  

Trent Share Price : TATA समूहाचा 'हा' शेअर ₹९००० पार जाण्याची शक्यता; स्टॉकनं गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक, ब्रोकरेज म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:08 PM

Tata Group Trent Share Price : टाटा समूहाच्या या शेअरबाबत ब्रोकरेज बुलिश दिसत आहे. या कंपनीचा शेअर २१ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा ब्रोकरेजनं व्यक्त केलंय.

Tata Group Trent Share Price : टाटा समूहाचा फॅशन आणि लाइफस्टाइल बिझनेस ट्रेंट लिमिटेडचा शेअर ९,२५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. २५ सप्टेंबर रोजी बीएसईवर बंद झालेल्या किमतीपेक्षा ही किंमत २१ टक्के अधिक आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म सिटीनं ही आशा व्यक्त केली आहे. सिटीने ट्रेंटच्या शेअरसाठी कव्हरेज सुरू केलं असून त्याला 'बाय' रेटिंग दिलंय. २६ सप्टेंबर रोजी बीएसईवरील ट्रेंटचा शेअर मागील बंदच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वधारला आणि ७,९३९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. परंतु गुरुवारी हा शेअर ७८०० रुपयांवर ट्रेड करत होता.

शेअरचा अपर प्राइस बँड ८,३७०.५५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २.७६ लाख कोटी रुपये आहे. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १३४.७ टक्क्यांनी वाढून ३९१.२१ कोटी रुपये झाला. वर्षभरापूर्वी तो १६६.६७ कोटी रुपये होता. या तिमाहीत कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल ५६ टक्क्यांनी वाढून ४,१०४.४४ कोटी रुपये झाला. तर जून २०२३ तिमाहीत तो २,६२८.३७ कोटी रुपये होता.

काय म्हटलंय सिटीनं?

सिटीने आपल्या नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे ट्रेंट शेअर आपल्या स्पर्धकांना मागे टाकत आहे आणि अपग्रेडला प्रोत्साहन देत आहे. कंपनी सिंगल फॉरमॅटऐवजी मल्टी-फॉरमॅट मॉडेलकडे वळल्यामुळे आर्थिक वर्ष २०१९ ते २०२४ या कालावधीत महसुलात ३६% सीएजीआर नोंदवला गेला. फॅशन, लाइफस्टाइल, किराणा आणि पर्सनल केअरमध्ये मल्टी कॅटेगरी प्लेअर म्हणून, ट्रेंटला आर्थिक वर्ष २०२४ ते २०२७ दरम्यान महसूल, एबिटडा आणि करोत्तर नफ्यात अनुक्रमे ४१%, ४४% आणि ५६% सीएजीआर मिळण्याची अपेक्षा असल्याचंही सिटीनं म्हटलंय.

दरम्यान, ट्रेंटचा शेअर निफ्टी ५० इंडेक्समध्ये सामील करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२४ पासून शेअर निफ्टी ५० इंडेक्सचा भाग असेल.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार