Tata Group Stocks: टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समुळे त्यांच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होत आहे. गेल्या एका आठवड्यात या शेअरमुळे गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर सुमारे 2000 रुपयांचं नुकसान झालंय. आजही कंपनीच्या या शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं असून तो 6473 रुपयांपर्यंत खाली आला आहे. आज सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात शेअरला लोअर सर्किट लागलंय.
या कालावधीत तो 18 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मात्र, ही घसरण होऊनही गेल्या एका महिन्यात हा शेअर 10 टक्क्यांहून अधिक वाढलाय. गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास अडीच पटीने वाढ झाली आहे. या कालावधीत त्यात 136 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालीये.
जर या वर्षाबद्दल बोलायचं झालं तर टाटा इन्व्हेस्टनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 52 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअरनं 835.70 रुपयांवरून हा स्तर गाठला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 9756.85 रुपये आणि नीचांकी स्तर 1730 रुपये आहे.
काय करते कंपनी?
आरबीआयच्या नियमांनुसार, टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पर्यंत लिस्ट करणं आवश्यक आहे, कारण ती उच्च श्रेणीतील एबीएफसी (NBFC) म्हणून वर्गीकृत आहे. पूर्वी ही कंपनी इन्व्हेस्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून ओळखली जायची.
ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आहे, जी प्रामुख्यानं इक्विटी शेअर्स आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजसारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीत कार्यरत आहे. कंपनी फेब्रुवारी 2008 मध्ये टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी बनली. टाटा समुहाच्या इतर कंपन्यांसह टाटा सन्सकडे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या पेड-अप भांडवलापैकी अंदाजे 73.38% हिस्सा आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)