Join us  

Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 5:50 PM

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.

Tata Share Market: आज, म्हणजेच 30 जानेवारी 2024 चा दिवस Tata Motors साठी अतिशय चांगला ठरला. आज कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून BSE वर 886.30 आणि NSE वर 885.95 च्या पातळीवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागील प्रमुख कारण, जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ची विक्रमी विक्री मानले जात आहे. याशिवाय, कंपनीने प्रवासी वाहनांच्या किमतीत केलेल्या वाढीचा शेअर्सच्या वाढीला फायदा झाला आहे. त्यामुळे, टाटा मोटर्सच्या मार्केट कॅपने मारुती सुझुकीच्या मार्केट कॅपला 3.159 लाख कोटी रुपयांनी मागे टाकले आहे.

गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बाजार बंद होईपर्यंत टाटा मोटर्सचे शेअर्स NSE वर 2.12 टक्क्यांच्या वाढीसह 858.85 रुपयांवर बंद झाले. FY24 च्या तिसऱ्या तिमाहीतील कंपनीचे आर्थिक आकडे उत्कृष्ट असतील अशी बाजाराची अपेक्षा आहे. कंपनी 2 फेब्रुवारी रोजी आपली आर्थिक आकडेवारी जाहीर करू शकते.

शेअर्स वाढण्याचे कारण?टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज झालेली वाढ अनेक कारणांमुळे दिसून आली. टाटा मोटर्सने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, ते 1 फेब्रुवारीला त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. यामध्ये कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे. टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हरने तिसऱ्या तिमाहीत 1.01 लाख वाहनांची विक्री केली, जी वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच, हा 11 तिमाहीतील सर्वाधिक आकडा आहे. मॉर्गन स्टॅनली आणि मोतीलाल ओसवालने या शेअरला पॉझिटिव्ह रेटिंग दिले आहे.

1 वर्षात पैसे दुप्पट?गेल्या एका आठवड्यात स्टॉकमध्ये 4.85 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे, तर एका महिन्यात स्टॉक 10 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तसेच, स्टॉकने गेल्या एका वर्षात 94 टक्के परतावा दिला आहे. या काळात शेअर 420 रुपयांनी वाढून 858 रुपयांच्या पुढे गेला. या अर्थाने, ने गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के किंवा जवळपास दुप्पट परतावा मिळाला.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक