Tata Motors share: टाटा मोटर्सच्या डी मर्जरच्या घोषणेनंतर मंगळवारी कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी टाटा मोटर्सच्या शेअरने इतिहास रचला आणि पहिल्यांदाच 1000 रुपयांची पातळी ओलांडली. मंगळवारी व्यवहारादरम्यान, या शेअरची किंमत 987 रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत सुमारे 7 टक्क्यांनी वाढून 1055 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. हा देखील या शेअरचा आजवरचा उच्चांकी स्तर आहे.
टाटा मोटर्स DVR च्या शेअरमध्येही तेजी
मंगळवारी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअरनं 705 रुपयांची पातळी गाठली. यापूर्वीच्या बंदच्या तुलनेत स्टॉक 7 टक्क्यांनी वाढला. डिफरेंशियल व्होटिंग राइट्स (DVR) हे साधारण शेअरप्रमाणेच आहे. या अंतर्गत, शेअरहोल्डरला मतदानाचे कमी अधिकार आहेत. यामध्ये कंपनी मतदानाचा हक्क न गमावता स्टॉक जारी करून निधी उभारू शकते.
डी-मर्जरची घोषणा
टाटा मोटर्सचं दोन भागांमध्ये विभाजन करण्यास कंपनीच्या बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. आता प्रवासी वाहन व्यवसाय (PV) आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय (CV), असे दोन भाग केले जाणार आहेत. दरम्यान, टाटा मोटर्सचे सर्व शेअर होल्डर्स या दोन्ही कंपन्यांमध्ये समान भागीदार असतील.
डीमर्जरनंतर एका युनिटमध्ये व्यावसायिक वाहने (CV) आणि त्या संबंधित गुंतवणूक असेल, तर दुसऱ्या युनिटमध्ये प्रवासी वाहने(PV), इलेक्ट्रिक वाहने(EV), जग्वार आणि लँड रोव्हरसह (JLR) संबंधित गुंतवणूक असेल. NCLT सेटलमेंट योजनेद्वारे डीमर्जरची अंमलबजावणी केली जाईल, असं कंपनीनं म्हटलंय. एनसीएलटी योजनेला टाटा मोटर्स बोर्ड, भागधारक, कर्जदार आणि नियामकांकडून मंजुरी आवश्यक आहे, ही सर्व प्रक्रिया 12-15 महिन्यांत पूर्ण केली जाऊ शकते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)