Tata Motors Share Price: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors च्या शेअर्सनी आज विक्रमी उच्चांक गाठला. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर-डिसेंबर 2023) मजबूत निकालांमुळे आज सलग पाचव्या दिवशी गुंतवणूकदार शेअर्सवर तुटून पडले. सध्या हा शेअर BSE वर 1.90 टक्क्यांच्या वाढीसह 875.60 रुपयांवर आहे.
कंपनीचेतिसऱ्या तिमाहीचे निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्सच्या लक्झरी जॅग्वार लँड रोव्हर (JLR) ची विक्री डिसेंबर तिमाहीत विक्रमी पातळीवर राहिली, त्यामुळे ही वाढ झाल्याचे मानले जात आहे. जग्वार लँड रोव्हरबद्दल बोलायचे झाल्यास, डिसेंबर तिमाहीत 1.01 लाख वाहनांची घाऊक विक्री झाली, जी वार्षिक आधारावर 27 टक्के होती आणि 11 तिमाहीत सर्वाधिक आहे. यामुळे डिसेंबर 2023 च्या तिमाहीत टाटा मोटर्सची कमाई आणि नफा देखील वाढण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, टाटा मोटर्सचा सुमारे दोन तृतीयांश महसूल जग्वार लँड रोव्हरमधून येतो. आता व्यावसायिक वाहनांबद्दल बोलायचे झाले तर डिसेंबर तिमाहीत ही विक्री केवळ 1 टक्क्यांनी वाढून 34,180 युनिट्सवर पोहचली, तर प्रवासी वाहनांच्या विक्रीत 8 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या 10 महिन्यांत टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 124% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 28 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्सचे शेअर्स 400.40 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होते. या पातळीपासून ते सुमारे 10 महिन्यांत 123.94 टक्क्यांनी उडी मारुन आज 31 जानेवारी 2024 रोजी 896.65 रुपयांवर पोहोचले.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)