Join us

Tata Motors Share : २०% पर्यंत घसरू शकतो Tata Motorsचा शेअर! सलग नवव्या दिवशी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:40 AM

Tata Motors Shares: येत्या काळात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता ब्रोकरेज फर्मनं व्यक्त केलीये. का होऊ शकते ही घसरण, काय आहेत कारणं, जाणून घेऊया.

Tata Motors Shares: ब्रोकरेज फर्म यूबीएसनं (UBS Securities) पुन्हा एकदा टाटा मोटर्सच्या (Tata Motos) शेअर्सवरील सेल रेटिंगचा पुनरुच्चार केला आहे. टाटा मोटर्सची ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) आणि भारताच्या प्रवासी वाहन सेगमेंटमधील मार्जिन कमी होण्याचा धोका कायम आहे. यूबीएसनं टाटा मोटर्सच्या शेअर्ससाठी ८२५ रुपयांचं टार्गेट प्राइस कायम ठेवले आहे. ही टार्गेट प्राईज सध्याच्या पातळीपेक्षा २० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दर्शवत आहे. आज सलग नवव्या दिवशी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

यूबीएसच्या या रिपोर्टनंतर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज सुरुवातीच्या व्यवहारात ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सकाळी ९.४० वाजता एनएसईवर टाटा मोटर्सचा शेअर ४.२२ टक्क्यांनी घसरून ९९२.०५ रुपयांवर व्यवहार करत होता. या वर्षी आतापर्यंत टाटा मोटर्सचे शेअर्स जवळपास २६ टक्क्यांनी वधारले आहेत.

JLR च्या प्रीमिअम मॉडेलची मागणी कमी?

यूबीएसनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, जेएलआरच्या डिफेंडर (Defender), रेंज रोव्हर (Range Rover) आणि रेंज रोव्हर स्पोर्ट (Range Rover Sport) या तीन प्रमुख प्रीमियम मॉडेल्सच्या विक्रीत घसरण दिसू लागली आहे. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की या मॉडेल्सची ऑर्डर बुक आता कोविडपूर्व पातळीवर आली आहे, ज्यामुळे आगामी काळात रेंज रोव्हरवरील सूटही वाढण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर मोठी सूट

दरम्यान, टाटा मोटर्सनं १० सप्टेंबर रोजी आपल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांवर मोठी सूट जाहीर केली. ही सवलत कंपनीच्या 'फेस्टिव्हल ऑफ कार्स' मोहिमेचा एक भाग आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असून ती केवळ ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध असेल. 

'या निर्णयामुळे देशभरात ईव्ही 'मेनस्ट्रीम' होण्यास मदत होईल. इतकंच नाही तर ग्राहकांना ५,५०० हून अधिक टाटा पॉवर स्टेशनवर ६ महिने मोफत चार्जिंग देखील दिलं जाईल. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा लांब आणि कमी अंतराचा प्रवास अधिक किफायतशीर होणार आहे,' असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय.

पेट्रोल, डिझेल वाहनांवरही सवलत

टाटा मोटर्सनं आयसीई (इंटरनल कंबशन इंजिन) वाहनांवर नुकतीच सूट दिल्यानंतर ही सवलत देण्यात आली आहे. या अंतर्गत २.०५ लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. बाजारात आपली पकड मजबूत करण्याच्या कंपनीच्या रणनीतीचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणक्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार