Join us  

टाटांच्या कंपनीनं रचला इतिहास, १३ वर्षाच्या उच्चांकी स्तरावर; ६ दिवसांत ९९ टक्क्यांनी वाढला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:48 PM

गेल्या सहा कामकाजाच्या दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचा कल दिसून येत आहे. मंगळवारी टाटा समूहाच्या या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला.

Tata Group Stock: टाटा समूहाची कंपनी टीआरएफचे शेअर्स (TRF Share) अनेकदा फोकसमध्ये असतात. गेल्या सहा कामकाजाच्या दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचा कल दिसून येत आहे. मंगळवारी टाटा समूहाच्या या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला. टाटा समूहाची कंपनी टीआरएफचे शेअर्स आजच्या व्यापारात ७.७ टक्क्यांनी वाढून 509.95 रुपयांच्या 13 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. गेल्या पाच सत्रांमध्ये हा शेअर 85% वाढला आहे. आजच्या वाढीसह, सहा दिवसांत स्टॉक जवळपास 99.30 टक्क्यांनी वधारलाय. 

काय आहे वाढीमागचं कारण? 

गेल्या आठवड्यातच टाटा समूहानं टाटा स्टील आणि टीआरएफ विलीनीकरणाचा प्रस्ताव रद्द केल्याची घोषणा केली होती. या वृत्तानंतर, इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर  सुविधा कंपनी टीआरएफ लिमिटेडचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात 20 टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचले. कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी त्यांच्या सहयोगी कंपनी टीआरएफ लिमिटेडच्या कामगिरीतील सुधारणा लक्षात घेऊन विलीन न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं टाटा स्टीलनं सांगितलं होतं. टाटा स्टीलने याआधी टीआरएफ, टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स, टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया, टाटा मेटालिक्स, द इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स, टाटा स्टील मायनिंग लिमिटेड आणि एस अँड टी मायनिंग कंपनी यासह नऊ धोरणात्मक व्यवसाय एकत्रित करण्याची योजना जाहीर केली होती. 

यांचं झालंय विलिनीकरण 

टाटा स्टील मायनिंग लिमिटेडचं ​विलीनीकरण 1 सप्टेंबर 2023 पासून प्रभावी आहे, तर टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लिमिटेडचं ​​विलीनीकरण 15 नोव्हेंबर 2023 पासून प्रभावी झालं आहे. 1 डिसेंबर 2023 पासून S&T मायनिंग कंपनी लिमिटेड आणि 15 जानेवारी 2024 पासून द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचं ​​विलीनीकरण झालं आहे. याशिवाय, Tata Metaliks Limited चं विलीनीकरण 1 फेब्रुवारी 2024 पासून प्रभावी झालं आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार