टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा टेलीसर्व्हिसेज (महाराष्ट्र) लिमिटेड अर्थात टीटीएमएलच्या (TTML stock Price) शेअरच्या तेजीला ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी टीटीएमएलच्या शेअरची किंमत जवळपास 6 टक्यांनी घसरली. या शेअरची क्लोजिंग प्राइस 5.25% च्या घसरणीनंतर, 76 रुपयांवर आली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून टीटीएमएलच्या शेअरमध्ये तेजी होती आणि यामुळेच बीएसईने आता कंपनीला प्राइस मूव्हमेंटवर स्पष्टीकरण मागितले आहे.
काय विचारले - गेल्या 13 जून, 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज अर्थात बीएसईने शेयर्समधील चढ-उतारासंदर्भात कंपनीकडे स्पष्टीकरण मागीतले होते. यावर आज (14 जून) टीटीएमएलने स्पष्टीकरण देताना, आम्ही नेहमीच कुठल्याही घटनेसंदर्भात एक्सचेन्जला तत्काळ सूचित केले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया विनियम, 2015 अंतर्गत एक्सचेन्जसोबत माहिती शेअर करण्याची तरतूद आहे.
टीटीएमएल स्टॉकने बीएसइवर सेन्सेक्सच्या तुलनेत एका वर्षाच्या कालावधीत सुमारे 43 टक्के एवढा निगेटिव्ह परतावा दिला आहे. सहा महिने आणि वार्षिक आधारावर या शेअरची किंमत अनुक्रमे, 24 टक्के आणि 18 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच तीन महिन्याच्या कालावधीत 28 टक्क्यांची तेजी, तर एका महिन्यात 23 टक्यांची तेजी दिसून आली आहे. गेल्या वर्षात जानेवारी 2022 मध्ये टीटीएमएलचा शेअर 290 रुपयांपर्यंत पोहोचला होता. सध्या या शेअरची किंमत 76.05 रुपयांवर आली आहे. म्हणजेच, आतापर्यंत हा शेअर 74 टक्क्यांनी घसरला आहे.