टाटा समूहाची स्टील कंपनी टाटा स्टीलनं बुधवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला नफा झाला आहे. यापूर्वी ही कंपनी तोट्यात होती. टाटा स्टीलनं 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत 522.14 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे, एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीला 2,224 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. मागील तिमाहीत (जुलै-सप्टेंबर), कंपनीनं इम्पेरमेंट शुल्कामुळे 6,196.24 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला होता. तिसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या घोषणेपूर्वी, टाटा स्टीलचे शेअर्स 5.06 टक्क्यांनी वाढून 135.15 रुपयांवर बंद झाले होते.
महसुलात 3 टक्क्यांची घसरण
कंपनीचा ऑपरेशन्स महसूल वार्षिक 3 टक्क्यांनी कमी होऊन 55,312 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी तो 57,084 कोटी रुपये होता. कंपनीनं एका निवेदनात असंही म्हटलंय की बोर्डानं 6 फेब्रुवारी ही टाटा मेटालिक्सच्या भागधारकांना शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख मंजूर केली आहे. विलीनीकरणाच्या योजनेनुसार, टाटा मेटालिक्सच्या प्रत्येक 10 शेअर्समागे, भागधारकांना टाटा स्टीलचे 79 शेअर्स मिळतील.
ब्रोकरेजचं मत काय?
टाटा स्टीलच्या शेअर्सबाबत ब्रोकरेजदेखील बुलिश आहेत. ब्रोकरेज जेफरीजने टाटा स्टीलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह, टाटा स्टीलची टार्गेट प्राईज 145 रुपयांवरून 160 रुपये करण्यात आली आहे. आशियाई फ्लॅट (एचआरसी) स्टीलच्या किमती मार्च-ऑक्टोबर या कालावधीत 22 टक्क्यांनी घसरल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत, असं जेफरीजनं स्टील कंपन्यांवरील नोटमध्ये म्हटलं आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यामध्ये देण्यात आलेली तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
तोट्यातून नफ्यात आली टाटांची ही कंपनी, आता शेअर खरेदीसाठी उड्या; एक्सपर्ट म्हणाले, ₹१६० पर्यंत जाणार भाव
कंपनीनं जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये कंपनीला मोठा नफा झाल्याचं दिसून आलं.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:57 AM2024-01-25T09:57:47+5:302024-01-25T09:58:19+5:30