टाटा ग्रुपची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर येणारा टाटा समूहाचा हा आयपीओ असून प्रत्येकजण या आयपीओची (IPO) वाट पाहतायत. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची (Tata Motors) उपकंपनी आहे. ३ ऑक्टोबर रोजी टाटा टेक्नॉलॉजीजनं (Tata Technologies) सेबीला (SEBI) त्यांच्या आयपीओच्या डीआरएचपीसाठी (DRHP) अडेन्डम सादर केले आहे. याचा अर्थ कंपनीनं आयपीओच्या तपशीलांमध्ये आणखी काही माहिती जोडली आहेत. आयपीओमधील एक हिस्सा टाटा टेक्नॉलॉजीजच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
टाटा टेक्नॉलॉजीज कर्मचार्यांसाठी राखीव हिस्सा हा कंपनीच्या पोस्ट ऑफर पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ०.५ टक्क्यांपर्यंत असेल. तर टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी राखीव हिस्सा ऑफरच्या १० टक्क्यांपर्यंत असेल. कर्मचार्यांसाठी राखीव हिस्सा आणि टाटा मोटर्स शेअरधारकांसाठी रिझर्व्ह हिस्सा काढल्यानंतर उरलेली ऑफरिंग नेट ऑफर म्हटलं जाईल.
९.५७ कोटी शेअर्स ऑफर केले जाणार
टाटा टेक त्यांच्या आयपीओमध्ये प्रति शेअर ₹२ फेस व्हॅल्यू असलेले ९.५७ कोटी शेअर्स ऑफर करणार आहे. आयपीओ पूर्णपणे ऑफर-फर-सेल (OFS) असेल. ओएफएस अंतर्गत, टाटा मोटर्स (Tata Motors), अल्फा टीसी (Alpha TC) आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ (Tata Capital Growth Fund I) शेअर्स विक्रीसाठी ठेवतील, जे कंपनीच्या एकूण स्टेकपैकी सुमारे २३.६० टक्के असतील. सध्या, टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये टाटा मोटर्सचा ७४.६९ टक्के हिस्सा आहे, अल्फा टीसी होल्डिंग्सचा ७.२६ टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ कडे ३.६३ टक्के हिस्सा आहे.