Join us  

TBI Corn Limited : पहिल्याच दिवशी ११० टक्क्यांचा फायदा, ₹९४ चा शेअर १९८ रुपयांवर पोहोचला; नंतर अपर सर्किट, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 11:43 AM

TBI Corn Limited : छोट्या कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीचा शेअर ११० टक्क्यांनी वधारून १९८ रुपयांवर लिस्ट झाला. नंतर या शेअरला अपर सर्किट लागलं.

TBI Corn Limited : टीबीआय कॉर्न लिमिटेड या छोट्या कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली आहे. टीबीआय कॉर्न लिमिटेडचा शेअर (TBI Corn Limited Share) ११०.६४ टक्क्यांनी वधारून १९८ रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ९४ रुपये होती. टीबीआय कॉर्न लिमिटेडचा आयपीओ ३१ मे २०२४ रोजी उघडला होता आणि तो ४ जून २०२४ पर्यंत खुला होता. टीबीआय कॉर्न लिमिटेडची एकूण पब्लिक इश्यू साईज ४४.९४ कोटी रुपये होती.

उत्तम लिस्टिंगनंतर टीबीआय कॉर्न लिमिटेडचे शेअर्स  (TBI Corn Limited) जबरदस्त लिस्टिंगनंतर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह २०७.९० रुपयांवर पोहोचले. टीबीआय कॉर्न लिमिटेडचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ७६.६५ टक्के होता, तो आता ५७.७१ टक्क्यांवर आला आहे. टीबीआय कॉर्न लिमिटेडची स्थापना २००० मध्ये करण्यात आली. ही कंपनी कॉर्न मील ग्रिट्सची उत्पादक आणि निर्यातदार आहे.  

टीबीआय कॉर्न लिमिटेड दुबई, ओमान, जॉर्डन, दक्षिण आफ्रिका आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये आपली उत्पादनं निर्यात करते. आयपीओमधून मिळणारी रक्कम विद्यमान युनिट्सचा विस्तार, वर्किंग कॅपिटल गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी वापरली जाईल. 

आयपीओला उत्तम प्रतिसाद 

टीबीआय कॉर्न लिमिटेडचा आयपीओ २३१ पटीहून अधिक वेळा सबस्क्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ५२३.२९ पट सब्सक्राइब झाला. तर नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा (NII) कोटा ५१६.५० पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कोटा ८१.४१ पट सब्सक्राइब झाला होता.  

टीबीआय कॉर्न लिमिटेडच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १२०० शेअर्स ठेवण्यात आले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना ११२८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक