देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचा (TCS) शेअर बायबॅक 1 डिसेंबरपासून सुरू झाला. यामध्ये गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची मोठी संधी आहे. टाटा समूहाच्या कंपनीचे बायबॅक 7 डिसेंबर रोजी बंद होईल. टीसीएसचे हे शेअर बायबॅक 17000 कोटी रुपयांचे आहे, ज्यामध्ये कंपनी 4.09 कोटी शेअर्स म्हणजेच 1.12 टक्के स्टेक बायबॅक करेल. हा बायबॅक टेंडर रुटनं केला जात आहे. बायबॅकची रेकॉर्ड डेट 25 नोव्हेंबर 2023 निश्चित करण्यात आली होती.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये, टीसीएसनं सांगितलं की बायबॅक 4150 रुपये प्रति शेअर असेल, जे रेकॉर्ड तारखेच्या बंद किंमतीपेक्षा 20 टक्क्यांनी अधिक आहे. 1 डिसेंबर रोजी बीएसईवर टीसीएसच्या शेअरची किंमत 3500 रुपये आहे. यापूर्वी, 7 जानेवारी रोजी टाटा समूहाच्या या कंपनीनं 18000 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक जाहीर केले होते, ज्यामध्ये 1.08 टक्के इक्विटी शेअर्स परत विकत घेतले गेले होते. गेल्या 5 वर्षांतील टीसीएसचं हे पाचवं बायबॅक आहे.
शेअर बायबॅक म्हणजे काय?
शेअर बाजाराच्या भाषेत याचा अर्थ शेअर्स परत घेणे, असा होतो. जेव्हा एखादी कंपनी नफ्यात असते, तेव्हा ती गुंतवणूकदारांना फायदा देण्यासाठी शेअर्स बायबॅक करते, म्हणजेच ती गुंतवणूकदारांकडून शेअर्स परत खरेदी करते. कंपनी शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन गुंतवणूकदारांकडून शेअर्स परत घेते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होतो.