एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड या टेक्सटाईल क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स गुरुवारी 2 टक्क्यांनी घसरले. यानंतर याची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली. गेल्या वर्षभरापासून स्टॉकवर दबाव आहे. एका वर्षाच्या कालावधीत, ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांचे 90 टक्क्यांहून अधिक नुकसान झालंय.
28 एप्रिल 2022 रोजी शेअर ₹1976 वर पोहोचला. ही या शेअरची आजवरची उच्चांकी पातळी आहे. तर, एक वर्षापूर्वी म्हणजेच 18 मे 2022 रोजी एसईएल मॅन्युफॅक्चरिंगच्या शेअरची किंमत ₹ 1333 वर होती. यानंतर, सततच्या घसरणीमुळे, आता एका वर्षानंतर शेअरची किंमत ₹ 133 वर आली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 44,102.29 कोटी रुपये आहे.
मॅनेजमेंटमध्ये बदल
अलीकडे, एसईएल मॅन्युफॅक्चरिंगनं मॅनेजमेंटमध्येदेखील बदल केलेत. कंपनीने अनुकुल भटनागर यांची बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केलेले नाहीत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत निव्वळ विक्री 142.57 कोटी रुपये होती. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 45.20 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत निव्वळ तोटा 60.02 टक्क्यांनी वाढला आहे.