Join us

HDFC Stock Market : देशाच्या सर्वात मोठ्या बँकेनं काढली शेअर बाजाराची हवा, गुंतवणूकदारांचे १.४५ लाख कोटी स्वाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 7:09 PM

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेबाबत एमएससीआयच्या व्यक्त केलेल्या अंदाजानं शेअर बाजारावर प्रभाव दाखवला.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेबाबत एमएससीआयच्या व्यक्त केलेल्या अंदाजानं शेअर बाजारावर प्रभाव दाखवला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं. शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स 6 टक्क्यांपर्यंत घसरले. दोन्ही कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 85 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. तर दुसरीकडे इंडसइंड बँकेच्या शेअरमध्येही 5.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

शेअर बाजार आपटला

शुक्रवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 694.96 अंकांनी घसरून 61,054.29 अंकांवर बंद झाला. कामकाजादरम्यान सेन्सेक्स 61,002.17 अंकांवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 186.80 अंकांच्या घसरणीसह 18,069 अंकांवर बंद झाला. कामकाजादरम्यान निफ्टी 18,055.45 अंकांवर पोहोचला होता.

एचडीएफसी ट्वीनचे शेअर घसरले

शेअर बाजारातील घसरणीचं खरे कारण म्हणजे एचडीएफसी ट्विनच्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड घसरण. HDFC चे शेअर्स कामकाजादरम्यान 5.57 टक्क्यांनी घसरून 2,703 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, एचडीएफसी बँकेचा शेअर 5.80 टक्क्यांनी घसरून 1627 रुपयांवर बंद झाला. कामकाजाच्या सत्रात बँकेचा शेअर 1,622 रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे एचडीएफसीच्या मार्केट कॅपमध्ये 29,233.66 कोटी रुपये आणि एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 55,946.10 कोटी रुपयांचा तोटा झाला. अशा स्थितीत दोन्ही कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये संयुक्तपणे 85,179.76 कोटी रुपयांची घट झाली आहे.

1.45 लाख कोटींचं नुकसान

शेअर बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे शुक्रवारी सुमारे दीड लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी कामकाज बंद झाल्यानंतर मार्केट कॅप 2,75,20,795.19 कोटी रुपये होतं. मात्र शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा मार्केट कॅप 2,73,75,251.56 कोटी रुपयांवर घसरलं. 

टॅग्स :एचडीएफसीशेअर बाजार