प्रसाद गो. जोशी
आगामी सप्ताहामध्ये येणारे रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आणि विविध कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल यामुळे बाजारामध्ये सावध वाटचाल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे परकीय वित्तसंस्थांची कामगिरी आणि अर्थविषयक जाहीर होणारी काही आकडेवारी यावरही बाजार वर-खाली जाण्याची शक्यता दिसत आहे.
अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजाराने त्याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. गतसप्ताहामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ने २२१२६.८० अंश असा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर तो थोडासा खाली येत २१,८५३.८० अंशांवर बंद झाला.
गतसप्ताहामध्ये या निर्देशांकात ५०१.२० अंशांची वाढ झाली. संवेदनशील निर्देशांक १३८४.९६ अंशांनी वाढून ७२,०८५.६३ अंशांवर बंद झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही चांगली वाढ झाली.
अंतरिक अर्थसंकल्पापाठोपाठ या सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यासाठीचा परजेस मॅनेजर्स इंडेक्स व अन्य काही आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहे. व्याजदरांमध्ये घट होण्याची बाजाराची अपेक्षा असली तरी ते अजून काही काळ स्थिरच राहण्याची शक्यता दिसते आहे.
बॉण्डसमध्ये सहा वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक
nभारतामधील बॉण्डसमध्ये जानेवारीत परकीय वित्तसंस्थांनी १९,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सहा वर्षांमधील परकीय वित्तसंस्थांची ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. जून २०१७नंतर यात सर्वाधिक वाढ झाली आहे.
nअमेरिकेमधील बॉण्डसच्या व्याजदरामध्ये चांगली वाढ झाल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी भारतातील शेअर बाजारामधून २५,७४३ कोटी रुपये काढून घेतले आहेत.
nसन २०२३मध्ये वित्तसंस्थांनी शेअर्समध्ये १.७१ लाख कोटी, तर बॉण्डसमध्ये ६८,६६३ कोटी रुपये अशी २.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.