Rajesh Power Services IPO : राजेश पॉवर सर्व्हिसेसच्या शेअर्सनं बाजारात येताच धुमाकूळ घातला आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेसच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. कंपनीचे शेअर्स ९०% प्रीमियमसह ६३६.५० रुपयांवर बाजारात लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ दिसून आली. आयपीओमध्ये राजेश पॉवर सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत ३३५ रुपये होती. कंपनीचा आयपीओ २५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि २७ नोव्हेंबरपर्यंत खुला होता.
शेअरला अपर सर्किट
राजेश पॉवर सर्व्हिसेसचा शेअर ९० टक्क्यांच्या वाढीनंतर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर म्हणजेच ६६८.३० रुपयांवर पोहोचला आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेसचा शेअर पहिल्या दिवशी ३३५ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ९९ टक्क्यांनी वधारला आहे. राजेश पॉवर सर्व्हिसेसची एकूण पब्लिक इश्यू साईज १६०.४७ कोटी रुपयांपर्यंत होती. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झालेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा १०० टक्के होता, जो आता ७३.४० टक्के झालाय.
५९ पट सबस्क्रिप्शन
राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ ५९ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ३१.९६ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा (एनआयआय) १३८.४६ पट, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणी ४६.३९ पट सबस्क्राईब झाली. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ १ लॉटसाठी बोली लावता येणार होती. या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये ४०० शेअर्स होते. म्हणजेच राजेश पॉवर सर्व्हिसेसच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना १.३४ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती.
कंपनी काय करते
राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडची स्थापना १९७१ मध्ये झाली. राजेश पॉवर सर्व्हिसेस स्टेट ट्रान्समिशन कंपन्या, डिस्ट्रिब्युशन कंपन्या, प्रायव्हेट युटिलिटीज आणि उद्योगांसाठी कन्सल्टन्सी सेवा पुरवते. राजेश पॉवर सर्व्हिसेसनं एचकेआरपी इनोव्हेशन्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे, जी ऊर्जा क्षेत्राला कस्टमाईज्ड आयटी सोल्यूशन्स प्रदान करते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)