Join us  

बाजार चढवू शकतो घटावर घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 5:45 AM

गतसप्ताहात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ- घट झाली असली तरी सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढीव पातळीवर बंद झाला आहे.

प्रसाद गो. जोशीसलग दुसऱ्या सप्ताहात बाजाराने वाढीव पातळी गाठली असली तरी आगामी सप्ताहात बाजार थोड्या प्रमाणात वाढ देण्याची शक्यता दिसत आहे. इस्रायल-हमास संघर्ष, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि जगभरातील आर्थिक घडामोडींचा बाजारावर परिणाम शक्य आहे. कंपन्यांच्या तिमाही निकालात अपेक्षित असलेली वाढ दिसून आल्यास काही कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता दिसत आहे. निफ्टीमधील सुमारे ४० टक्के कंपन्यांचे तिमाही निकाल येत्या सप्ताहात जाहीर होणार आहेत. 

गतसप्ताहात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ- घट झाली असली तरी सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढीव पातळीवर बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६६,२८२.७४ अंशांवर  बंद झाला. त्यामध्ये २८७.११ अंशांनी वाढ झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली.  

आगामी सप्ताहात बाजारात फार मोठी   उलाढाल होण्याची शक्यता दिसत नाही. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्ष आणि त्यामुळे खनिज तेलाच्या दरामध्ये होत असलेली वाढ याचा बाजारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या सप्ताहात चीनच्या उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे चीन, अमेरिका आणि युरोपमधील वस्तूंच्या विक्रीची आकडेवारीही जाहीर होणार आहे. यामधून बाजाराला दिशा मिळू शकते. तसेच देशांतर्गत घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचे आकडे व विविध कंपन्यांचे किमान निकाल जाहीर होणार आहेत. 

परकीय वित्तसंस्थांची मोठी विक्रीnपरकीय वित्तसंस्थांनी ऑक्टोबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री केलेली दिसून येत आहे. या महिन्याच्या पहिल्या १३ दिवसांत या संस्थांनी ९,७८४ कोटी रुपयांची विक्री केली आहे. गतसप्ताहात परकीय वित्त संस्थांनी २,२०० कोटी रुपयांची विक्री केली आहे. जगभरात युद्धामुळे घबराट असून याचा परिणाम म्हणून खनिज तेलाचे उत्पादन कमी होणार आहे. यामुळेच त्याचे दर वाढत आहेत. 

nयुद्धजन्य परिस्थितीमुळे अस्थिरता निर्माण होते आणि परकीय वित्तसंस्था अधिक सुरक्षित पर्याय म्हणून अमेरिकेच्या बॉण्डसमध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यामुळेच भारत तसेच अन्य विकसनशील देशातून आपली गुंतवणूक काढून घेण्याकडे या संस्थांचा कल दिसून आला आहे. मात्र, देशांतर्गत वित्तीय संस्था बाजाराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या संस्थांनी आपली खरेदी सुरूच ठेवली आहे.

टॅग्स :शेअर बाजार