- प्रसाद गो. जोशी
शेअर बाजार गत सप्ताहात चांगलाच तेजीचा दिसून आला. सलग चौथ्या सप्ताहात बाजारामध्ये वाढ झालेली दिसून आली. रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुसार वाढविलेले दर, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली खरेदी आणि कमी झालेला चलनवाढीचा दर यामुळे बाजाराला उभारी मिळाली. असे असले तरी आगामी काळात जागतिक मंदीची भीती बाजारावर कायम आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गतसप्ताहात १०७४.८५ अंशांनी वाढून ५९,४६३.७८अंशांवर पोहोचला. निफ्टी १७६९८.१५ अंशांवर गेला असून, त्यामध्ये सप्ताहभरात ३००.६५ अंशांची वाढ झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅपनेही वाढ दाखविली आहे.
स्थिर झालेला रुपया, तेलाचे स्थिर दर यामुळे बाजारात गुंतवणूकदार परतले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. गेल्या महिन्यापासून बाजारात खरेदीसाठी उतरलेल्या परकीय वित्तसंस्थांनी या सप्ताहात चांगली खरेदी केली. त्यांनी आठवड्यामध्ये ७८४९.५७ कोटी रुपयांची खरेदी केली. ऑगस्ट महिन्यामध्ये या संस्थांनी आतापर्यंत २२,४६२ कोटी रुपये बाजारात ओतले आहेत. देशांतर्गत वित्तसंस्था मात्र सध्या नफा कमवण्याच्या मागे आहेत. ऑगस्ट महिन्यात या संस्थांनी ४२४३.७८ कोटी रुपये बाजारातून काढून घेतले. त्यापैकी २४७८.१९कोटी रुपये हे गतसप्तहात काढले गेले आहेत. गत सप्ताहात शेअर बाजारात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता ४ लाख ७७ हजार १०७.२५ कोटी रुपयांनी वाढली आहे. सप्ताहाच्या प्रारंभी बाजारातील एकूण मालमत्तेचे मूल्य २,७०,३०,७८१.८४ कोटी रुपये होते ते वाढून २,७५,०७,८८९.०९ कोटी रुपयांवर गेले आहे. या आधीच्या सहा सप्ताहांमध्ये ही बाजाराच्या भांडवलमूल्यात वाढ झालेली दिसून आली.
पहिल्या दहापैकी सहा कंपन्यांचे वाढले शेअर
बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या मूल्यांमध्ये गतसप्ताहात एक लाख ५६ हजार २८७.३५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामधील सर्वाधिक वाढ रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये असून स्टेट बँक या कंपनीचे भांडवल कायम राहिले आहे. तीन कंपन्यांचे भांडवल कमी झाले असून, या कंपन्या इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एलआयसी या आहेत.