Oriana Power Share : सौर ऊर्जा व्यवसायाशी संबंधित ओरियाना पॉवर या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ओरियाना पॉवरचा शेअर गुरुवारी ४ टक्क्यांहून अधिक वधारून २१५५ रुपयांवर पोहोचला. मोठं प्रोजेक्ट मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली. ओरियाना पॉवरनं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कंत्राट मिळाल्याची माहिती दिली आहे. या कंत्राटात कंपनीला ७५ मेगावॅट क्षमतेचा एसी सौर ऊर्जा प्रकल्प उभारायचा आहे.
मिळाला ३७५ कोटींचा प्रोजेक्ट
ओरियाना पॉवरला मिळालेला हा प्रकल्प ३७५ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पात पीएम-कुसुम योजनेअंतर्गत जमीन आणि पारेषण वाहिन्यांसह फीडर लेव्हल सोलरायझेशन राबविण्याचा समावेश आहे. एक्स्चेंज फाइलिंगनुसार, हा प्रकल्प १२ महिन्यांत पूर्ण करायचाय. यावर्षी १० जुलै रोजी ओरियाना पॉवरला अशीच ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डरची किंमत १५५ कोटी रुपये होती आणि कॅप्टिव्ह सेगमेंट अंतर्गत राजस्थानमधील ४० मेगावॅटच्या सौर प्रकल्पाचा समावेश होता.
११८ रुपयांवर आलेला आयपीओ
ओरियाना पॉवरचा आयपीओ १ ऑगस्ट २०२३ रोजी खुला झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ११८ रुपये होती. ११ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स १६० टक्क्यांहून अधिक वाढीसह ३०२ रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी ओरियाना पॉवरचा शेअर आणखी वधारला आणि कंपनीचा शेअर ३१७.१० रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी २१५५ रुपयांवर पोहोचला आहे.
ओरियाना पॉवरच्या शेअरमध्ये ११८ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत १६२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर २९८४ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३०५ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.